६ ऑक्टोबर रोजी ‘नैसर्गिक शेती’ कार्यशाळेचे आयोजन

<em>६ ऑक्टोबर रोजी ‘नैसर्गिक शेती’ कार्यशाळेचे आयोजन</em>

पुणे, दि.४: कृषि विभागामार्फत ६ ऑक्टोबर रोजी शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे ‘नैसर्गिक शेती’ संदर्भात कार्यशाळेच आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेकडून (आत्मा) देण्यात आली आहे.

गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे आदी मान्यवर कार्यशाळेला उपस्थित राहणार आहेत.

नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याच्यादृष्टीने राज्यपाल आचार्य देवव्रत हे त्यांनी कुरुक्षेत्र हरियाणा येथे केलेले नैसर्गिक शेतीचे प्रयोग आणि प्रसाराबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

राज्यभरातून सुमारे २ हजारावर शेतकरी या कार्यशाळेला उपस्थित राहणार आहेत. तांत्रिक सत्रात तज्ज्ञांचे मार्गदर्शन तसेच नैसर्गिक शेती करणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अनुभव ऐकायला मिळणार आहेत. कार्यशाळेला जोडून नैसर्गिक शेतीबाबतच्या एका प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे थेट प्रक्षेपण कृषि विभागाच्या युट्यूब चॅनलवर https://www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणाची व्यवस्था ग्रामपंचायत कार्यालय, शासकीय कार्यालये, कृषि विज्ञान केंद्र, कृषि संशोधन संस्था आदी ठिकाणी करण्यात येणार आहे.

या कार्यशाळेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आत्माचे कृषी संचालक दशरथ तांभाळे यांनी केले आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )