One Nation, One Election, समान नागरी कायद्याचा पुन्हा हुंकार; काय म्हणाले पंतप्रधान

One Nation, One Election, समान नागरी कायद्याचा पुन्हा हुंकार; काय म्हणाले पंतप्रधान

भाजप, समान नागरी कायद्याच्या दृढसंकल्पावर कायम असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. One Nation, One Election हा सुद्धा महत्वाचा मुद्दा भाजपसमोर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजप बहुमताने निवडून आल्यावर पहिल्या टप्प्यात भाजप या मुद्यांना हात घालणार असल्याचे आता समोर आले आहे. भाजपने आज, 14 एप्रिल 2024 रोजी नवी दिल्लीत लोकसभा निवडणूक 2024 साठीचा जाहीरनामा जाहीर केला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा तर शुभ दिवस
आज मोठा शुभ दिवस आहे. देशातील अनेक राज्यात यावेळी नवीन वर्षाचा उत्साह आहे. नवरात्रीचा आज सहावा दिवस आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. अशा सुमंगल क्षणी भाजप विकसीत भारतासाठी जाहिरनामा सादर करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी सर्व देशवासियांना या मंगलदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
UCC लागू होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वन नेशन-वन इलेक्शनचे स्वप्न त्यांचे सरकार पूर्ण करण्याचा संकल्प केला. तसेच समान नागरी कायद्यावर ही भाजपचे सडेतोड विचार मांडले. आज देशासाठी UCC अत्यंत आवश्यक असल्याचे ते म्हणाले. हा समान नागरी कायदा देशात लागू करण्यात येईल, असा दृढसंकल्प त्यांनी व्यक्त केला. भ्रष्टाचारावर देशात कडक कारवाई सुरु आहे. गरीब आणि मध्यमवर्गाला त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवणारे तुरुंगात जातील, असे पंतप्रधान म्हणाले. ही कारवाई सुरुच राहिले, हे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत मोठ्या बहुमताने निवडून येण्याचा विश्वास दाखवला. 4 जूननंतर जाहिरनाम्यातील वचनावर, अश्वासनांवर लागलीच काम करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सरकार सध्या 100 दिवसांच्या योजनेवर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
पीएमची गॅरंटी
भाजपने प्रत्येक आश्वासनाची गॅरंटी दिली आहे. आमचे उद्दिष्ट डिगनिटी ऑफ लाईफ असल्याचे ते म्हणाले. भाजप सरकारने या दहा वर्षांत 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढल्याचा दावा त्यांनी केला. जनऔषधी केंद्रांवर सर्वसामान्य, गरिबांना 80 टक्के सवलतीत औषधी मिळण्याची गॅरंटी सुरु राहिल असे ते म्हणाले. तर भाजपने वचन दिल्यानुसार, 70 वर्षांवरील प्रत्येक भारतीय नागरिकाला आता आयुष्यमान भारत योजनेतंर्गत 5 लाखांपर्यंतचा इलाज मोफत मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.