शरद पवार देणार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला धक्का, बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

शरद पवार देणार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला धक्का, बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आयाराम गयाराम यांची चलती आहे. भाजपमध्ये सुरु असलेले इनकमींग थांबले आहे. आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजप आणि शिवसेनेला धक्के दिले जात आहेत. जळगाव जिल्ह्यातून श्रीराम पाटील यांनी भाजप सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मागील आठवड्यात प्रवेश केला. त्यानंतर त्यांना रावेर लोकसभा मतदार संघाची उमेदवारी मिळाली. दोन, तीन दिवसांपूर्वी माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. माढामध्ये महायुतीने रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे ते नाराज होते. आता पश्चिम महाराष्ट्रातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनाला शरद पवार यांनी धक्का दिला आहे. माजी आमदार नारायण आबा पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहे.
नारायण पाटील पुन्हा राष्ट्रवादीत
नारायण पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते आहेत. ते करमाळा विधानसभा मतदारसंघातून १३व्या विधानसभेत निवडून आले होते. 2014 ते 2019 काळात ते आमदार होते. यामुळे करमाळ्यात शिंदे गटाला झटका मिळणार आहे. शरद पवारांची करमाळ्यात २६ तारखेला सभा होणार आहे. त्या सभेत नारायण पाटील पुन्हा राष्ट्रवादीत जाणार आहे.
नारायण पाटील २०१४ मध्ये राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले होते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. २०१९ मध्ये बंडखोरी करुन ते अपक्ष म्हणून विधानसभा निवडणुकीत उतरले. त्यावेळी त्यांनी ७२ हजार मते घेतली होती. परंतु ते शिवसेनेत राहिले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्याबरोबर गेले. आता शिंदे सेनेतून पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जात आहे.
माढात शरद पवारांची होणार अडचण
भाजप नेते धैर्यशील मोहिते-पाटील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात पक्ष प्रवेश करणार आहेत. त्यांना माढा लोकसभेची उमेदवारी मिळणार आहे. यामुळे माढामध्ये राष्ट्रवादीत बंडखोरी होणार आहे. शरद पवार गटाचे नेते अभयसिंह जगताप हे माढा लोकसभेसाठी इच्छूक होते. मात्र आता ते बंडखोरीचे निशाण फडकावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जगताप अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. अभयसिंह जगताप हे माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांचे निकटवर्तीय आहेत. ते मागील ६ महिन्यांपासून माढा मतदारसंघात काम करत होते.