शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्यावतीने अवयवदानाविषयी जनजागृती अभियान

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्यावतीने अवयवदानाविषयी जनजागृती अभियान

बारामती दि. १३: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्यावतीने शारदाबाई पवार नर्सिंग कॉलेज व औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय माळेगाव येथे अवयवदान या विषयावर व्याख्यान व जनजागृतीअंतर्गत पोस्टर प्रदर्शन व पथ नाट्य सादरीकरण करण्यात आले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अभियान नोडल ऑफिसर डॉ. प्रज्ञा भालेराव, समन्वयक डॉ. तुषार सावरकर, समाज सेवा अधीक्षक मोहन साखरे, डॉ. प्रशांत खताळ व संध्या नाईक यांनी अभियानात सहभाग घेतला.

यावेळी शारदाबाई पवार नर्सिंग कॉलेज येथे तसेच औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय माळेगाव येथे डॉ. तुषार सावरकर यांचे व्याख्यान झाले. व्याख्यानात त्यांनी भारतातील अवयवदान चळवळ, या चळवळीचा इतिहास, अवयवदान चळवळीचा वाढता प्रभाव, विविध राज्यातील अवयव दान व प्रत्यारोपण, अवयव दानातील अडचणी, मृत स्तंभ अवयवदान व जीवित व्यक्तीकडून होणारे अवयवदान, प्रत्यारोपणात स्त्री व पुरुष विषमता, अवयव दान व प्रत्यारोपण बाबतच्या कायदेशीर बाबी इत्यादींबाबत माहिती दिली.

महाराष्ट्र राज्यातील अवयवदानाशी संबंधित सर्व समस्या सोडविण्यासाठी आणि अवयवदानाबाबत अधिकाधिक प्रमाणात प्रसार करण्याच्या दृष्टीकोनातून वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग काम करणार आहे. त्यानुषंगाने ७ एप्रिल पासून वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांच्या मार्फत संपूर्ण वर्षभर ‘अवयवदान जनजागृती अभियान’ राबविण्यात येत आहे.

डॉ. प्रज्ञा भालेराव यांनी विद्या प्रतिष्ठानचे ॲग्री कल्चरल बायोटेक्नॉलॉजी महाविद्यालयात अवयव दान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांच्या सहभागाविषयी मार्गदर्शन केले. तसेच अवयव दान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा दिली.

नर्सिंग महाविद्यालय व औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्याच्या विद्यार्थ्यानी पथ नाट्य व पोस्टर सादरीकरणाद्वारे सहभाग घेतला. डॉ. प्रज्ञा भालेराव व डॉ. प्रशांत खताळ यांनी पोस्टर्सचे परीक्षण करून विद्यार्थ्यांशी चर्चा केली.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )