प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

पुणे, दि. २७ : केंद्र शासनाने पारंपरिक बलुतेदार कारागिरांच्या उद्योग-व्यवसायास स्थैर्य मिळावू या उद्देशाने प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सुरू केली असून योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पारंपरिक बलुतेदार कारागिरांनी सामान्य सुविधा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्रात नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा विश्वकर्मा अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी पारंपरिक कारागिरांची नोंदणी आवश्यक आहे. नोंदणीकरिता आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्म तारखेचा पुरावा किंवा हस्तांतरण प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, शिधापत्रिका, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, बँकेचे पासबुक, व आधारकार्ड संलग्न मोबाईल नंबर आवश्यक आहे.

ग्रामीण व शहरी पारंपरिक बलुतेदार कारागिरांच्या उद्योगास स्थैर्य निर्माण करणे, त्यांना व्यवसायीक प्रशिक्षण देवून आर्थिक मदत, ब्रँड प्रमोशन आणि मार्केट लिंकेजसाठी व्यासपीठ तयार करणे यासाठी केद्र शासनाच्या सुक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाने प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी पारंपरिक बलुतेदार कारागिरांना ५ टक्के व्याजदरात विना तारण ३ लाखापर्यंत दोन टप्प्यात कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.

प्रशिक्षण घेणाऱ्या कारागिरांना ५ दिवसीय मुलभूत प्रशिक्षण व १५ दिवसीय कौशल्य पुर्ण प्रशिक्षण दिले जाणार असून प्रशिक्षण कालावधीत रूपये प्रति दिन ५०० रूपये विद्यावेतन दिले जाणार आहे. प्रशिक्षणानंतर प्रधानमंत्री विश्वकर्मा प्रमाणपत्र तसेच ओळखपत्र प्रदान केले जाणार आहे. प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या कारागीरांना टूलकिट खरेदीसाठी १५ हजार रूपयांचे व्हाऊचर्सदेखील देण्यात येणार आहे.

सुतार, लोहार, सोनार (दागिने कारागीर), कुंभार, न्हावी, माळी (फुल कारागीर), धोबी, मुर्तीकार, टोपल्या, झाडु, बांबुच्या वस्तु बनवणारे, शिंपी, गवंडी, चर्मकार, अस्त्रकार, बोट बांधणारे, अवजारे बनवणारे, खेळणी बनविणारे, कुलूप बनविणारे व विणकर कामगार इत्यादी पारंपरिक कारागीर या योजनेत समाविष्ट केले आहेत.

पुणे जिल्ह्यात नोंदणीस प्रारंभ झाला असून योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पारंपरिक बलुतेदार नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकऱ्यांनी केले आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )