शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अवयव दान जनजागृती अभियान

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अवयव दान जनजागृती अभियान

बारामती दि. ७ : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती येथे अवयव दान जनजागृती अभियानांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी व कर्मचाऱ्यांनी अवयवदान जनजागृतीसाठी प्रतिज्ञा घेतली.

या कार्यक्रमात अभियानाचे नोडल ऑफिसर डॉ. प्रज्ञा भालेराव, समन्वयक डॉ. तुषार सावरकर, समाज सेवा अधिक्षक मोहन साखरे, संध्या नाईक, सहयोगी प्राध्यापक डॉ. सूरज जाधवार, डॉ. अंजली शेट्ये, डॉ. नंदकुमार कोकरे, डॉ. राहुल मस्तूद, डॉ. प्रशांत खटाळ, डॉ. मनोज पाटेकर आदी उपस्थीत होते.

महाराष्ट्र राज्यातील अवयवदानाशी संबंधित सर्व समस्या सोडविण्यासाठी आणि अवयवदानाबाबत अधिकाधिक प्रमाणात प्रसार करण्याच्या दृष्टीकोनातून ७ एप्रिल पासून वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाअंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमार्फत संपूर्ण वर्षभर ‘अवयवदान जनजागृती अभियान’ राबविण्यात येणार आहे.

या अभियानाचा भाग म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती येथे अवयवदान जनजागृतीसाठी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पोस्टर्स प्रेझेंटेशन व पथनाट्याच्या माध्यमातून अवयवदान म्हणजे काय? त्याची प्रक्रिया, अवयव प्रत्यारोपण, त्याबाबतचे नियम, अटी, इत्यादि महिती दिली.

कार्यक्रमात डॉ. भालेराव यांनी अवयव दान जनजागृती अभियानाबाबतची माहिती देवून अभियानात घेण्यात येणारे वेगवेगळे कार्यक्रम, टप्पे व जनजागृतीची आवश्यकता का आहे? याबाबातची माहिती सांगितली.

त्यानंतर डॉ. जाधवार यांनी मार्गदर्शनात अवयवदानाविषयीचे प्रश्न व गैर समजांबाबत चर्चा करून जागतिक व भारताच्या स्थिती बाबत माहिती दिली. उपस्थितांना अवयवदानाच्या कायद्याबाबत त्यांनी अवगत केले.

          *अवयवदानाची सद्यस्थिती*

सध्या भारतात शेवटच्या टप्प्यातील मूत्रपिंड आणि यकृताच्या आजारांच्या उपचारांसाठी २ लाख मूत्रपिंड आणि १ लाख यकृताची गरज आहे, मात्र दरवर्षी केवळ ४ हजार मूत्रपिंड प्रत्यारोपण आणि ५०० यकृत प्रत्यारोपण केले जात असून हजारो रुग्ण नवीन आयुष्य जगण्याच्या संधीच्या प्रतीक्षेत अवयवांअभावी मृत्युमुखी पडत आहेत. हृदयाची परिस्थिती आणखी बिकट असून ५ हजार रुग्णांना हृदयाची गरज असून केवळ २० ते ३० हृदय प्रत्यारोपण केले जात आहे.

आज अवयव मिळत नसल्याने किडनी प्रत्यारोपण व लिव्हर प्रत्यारोपण करण्याकरिता बरीच प्रतीक्षा यादी आहे. एक ब्रेन डेड रुग्णांमुळे ७ अवयव गरजू रुग्णाचे जीव वाचू शकतात परंतु ब्रेन डेड रुग्णाच्या नातेवाईकाकडून गैरसमजामुळे अवयव दान करण्यात येत नाही. अवयव दान चळवळी मधून हा गैरसमज दूर केल्यास अवयव दानाचे प्रमाण नक्कीच सुधारेल.

अवयव निकामी झालेल्या रुग्णास अवयव मिळाल्यानंतर केवळ त्याचाच जीव वाचत नाही तर त्यावर अवलंबून असलेले संपूर्ण कुटुंब पूर्ववत होते. त्याकरिता अवयव दानाची मोठ्या प्रमाणात चळवळ उभी राहणे आवश्यक आहे व त्यातून अवयवदानाचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे. त्याकरिता अवयवदानाबाबत जनजागृती चळवळीला गती देणे आवश्यक आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )