सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात जागतिक क्षयरोग दिनाचे आयोजन

सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात जागतिक क्षयरोग दिनाचे आयोजन

पियाजो कंपनीने घेतले १५० रुग्ण दत्तक

बारामती, दि.७: सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने पियाजो कंपनीने क्षयरोगाचे उपचार सुरू असलेल्या १५० रुग्णांना दत्तक घेत त्यांना पोषण आहार किटचे वाटप केले.

याप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, पियाजो व्हेईकल कंपनीचे व्यवस्थापक किरण चौधरी, तालुका विस्तार अधिकारी सुनील जगताप, पर्यवेक्षक, परिचारिका, पंचायत समिती आरोग्य विभाग व सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी डॉ. मनोज खोमणे म्हणाले, सद्यस्थितीमध्ये बारामती तालुका व शहरामध्ये एकूण ६८० क्षय रुग्णांची नोंद आहे. समाजामधील दानशूर निक्षय मित्रांनी जास्तीत जास्त क्षय रुग्णांना दत्तक घेऊन क्षय रोगाचे उच्चाटनाकरिता मदत करावी.

कार्यक्रमात पियाजो व्हेईकल कंपनी प्रा. लि. तर्फे बारामती शहर व बारामती तालुक्यांतर्गत औषध उपचारावर असणाऱ्या १५० क्षय रुग्णांना दत्तक घेऊन सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालय येथे पोषण आहाराचे किट वाटप करण्यात आले. कंपनीचे व्यवस्थापक श्री. चौधरी यांनी क्षय रुग्णांना मोठ्या प्रमाणावर यापुढील काळात देखील मदत करण्यात येईल असे आश्वासन दिले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )