युवकांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावून नागरीकांमध्ये जनजागृतीचे कार्य करावे – प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांचे आवाहन

युवकांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावून नागरीकांमध्ये जनजागृतीचे कार्य करावे – प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांचे आवाहन

बारामती, दि. 25: भारतातील लोकशाही बळकट करताना युवकांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावणे आवश्यक असून नागरीकांमध्ये जनजागृतीचे कार्य करण्यात महत्त्वाचे योगदान द्यावे, असे आवाहन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त तहसिल कार्यालय येथे आज प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवडणूक नायब तहसिलदार पी.डी.शिंदे, संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसिलदार महादेव भोसले, नायब तहसिलदार विलास करे, भक्ती सरवदे- देवकाते, तहसिल कार्यालयातील कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, भारतीय लोकशाही बळकट व सक्षम होण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. लोकशाही बळकट करण्याचे काम मतदार नोंदणीतून आणि मतदानामध्ये सक्रीय सहभागातून होत असल्याने युवकांनी यात पुढाकार घ्यावा.
वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक पात्रताधारक भारतीय नागरिकाला मतदानाचा पवित्र हक्क बजावावा यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. त्याअंतर्गत तहसिल कार्यालयालयाच्या निवडणूक शाखेमार्फत रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, वतृत्व स्पर्धा, गणेश उत्सवात मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. यावेळी जास्तीत जास्त मतदारनोंदणी जनजागृतीबाबत घेण्यात आलेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेल्या कसबा येथील श्री काशिविश्वेश्वर तरुण मंडळास प्रांताधिकारी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, पारितोषिक व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला तसेच नवमतदार विद्यार्थ्यांना मतदान ओळखपत्राचे वितरण करण्यात आले.
निवडणूक आायोगाचा 25 जानेवारी हा स्थापना दिवस देशभरामध्ये राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. मतदारामंध्ये मतदाना विषयी जनजागृती व्हावी, नवीन मतदार नोंदणी व्हावी या उद्देशाने या दिवशी वेगवेगळया कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मतदानासारख्या पवित्र कर्तव्यापासून कोणी वंचित राहू नये, असेही श्री. कांबळे यावेळी म्हणाले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )