महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची बारामती पालखी मुक्काम स्थळाला भेट

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची बारामती पालखी मुक्काम स्थळाला भेट

बारामती दि. ८: महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बारामती, इंदापूर तालुक्यातील सणसर येथील पालखी मुक्काम स्थळ व बेलवाडी येथील रिंगण स्थळाची आज पाहणी केली. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत सोपानकाका महाराज यांच्या पालख्या बारामती आणि इंदापूर तालुक्यातून मार्गस्थ होतात. पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीची सर्व कामे शासकीय यंत्रणेने समन्वयाने आणि वेळेत पूर्ण करून हा सोहळा वारकऱ्यांसाठी आनंददायी करावा, असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

यावेळी आमदार जयकुमार गोरे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर आदी उपस्थित होते.

श्री.पाटील यांनी बारामतीतील शारदा प्रांगण आणि इंदापूर तालुक्यातील सणसर येथील पालखी थांबा आणि बेलवाडीतील रिंगण परिसराची पाहणी केली. ते म्हणाले, पालखी सोहळ्यात महाराष्ट्रातील तसेच शेजारील राज्यातील लाखो भाविक सहभागी होत असतात. यावर्षी पालखी सोहळा नेहमीपेक्षा अगोदर होत आहे. उन्हाची तीव्रता अधिक आहे. त्यादृष्टीने सर्वच यंत्रणांनी दक्षता घेवून पालखी सोहळ्याचे उत्तम नियोजन करावे.

पालखी मुक्कामाच्या विसाव्याच्या ठिकाणी सर्व सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात. शुद्ध पिण्याचे पाणी, फिरते शौचालय, महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्था, वीज, अग्निशमन पथक, आरोग्य सुविधा, आरोग्य सेवक, रुग्णवाहिका इत्यादी सोयी सुविधा देण्यात याव्यात.

बऱ्याच दिंड्या मुख्य पालखी सोहळ्याच्या पुढे असतात. यावेळी मुख्य पालखीनंतर त्या दिंड्या मार्गस्थ होतील याबाबतचे नियोजन करावे. दिंड्यांची नोंदणी करावी. पालखी मार्गावरील रस्त्यांची कामे पूर्ण करावीत. पालखी विसावा मुक्कामाच्या ठिकाणी नियुक्त केलेल्या सर्व अधिकाऱ्यांची संपर्क निर्देशिका तयार करण्यात यावी. अधिक चांगल्या प्रकारच्या नियोजनासाठी मानक कार्यरत प्रक्रिया (एसओपी) तयार करावी. पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

मुख्याधिकारी महेश रोकडे आणि इंदापूरचे तहसिलदार श्रीकांत पाटील यांनी पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबतची माहिती दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अनंत भोईटे, तहसिलदार गणेश शिंदे, इंदापूरचे तहसिलदार श्रीकांत पाटील, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, इंदापूरचे गट विकास अधिकारी विजय कुमार परिट, मुख्याधिकारी महेश रोकडे, पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे आदी उपस्थित होते.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )