मताधिकार जागृतीसाठी ‘लोकशाही भोंडला’ स्पर्धेचे आयोजन

पुणे, दि.6:- लोकगीतांचा पारंपरिक गोडवा आणि समाजाला आवाहन करण्याची त्यांची ताकद लक्षात घेऊन यंदा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे ‘लोकशाही भोंडला’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
नवरात्र हा निसर्गाच्या सर्जनशीलतेचा आणि निर्मितीशील स्त्रीशक्तीचा उत्सव आहे. भोंडला गीते महाराष्ट्रातील या उत्सवाचे एक वैशिष्ट्य आहे. आपल्या लोकसंस्कृतीचं वैशिष्ट्य असणारा भोंडला कुठे हादगा, तर कुठे भुलाबाई म्हणून साजरा केला जातो. सासर-माहेर, तिथली प्रेमा-द्वेषाची नाती हे सगळं स्त्रिया या लोकगीतांतून वर्षानुवर्ष सांगत आल्या आहेत.
कुटुंबातील स्त्रीपर्यंत एखादी गोष्ट पोहोचल्यास ती फक्त तिच्यापुरती मर्यादित न राहता संपूर्ण कुटुंबाला त्याच्यात सहभागी करून घेत असते. स्त्रीची हीच ताकद लक्षात घेऊन ‘लोकशाही भोंडला’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून स्त्रिया आपल्या मताधिकाराचा, लोकशाही मूल्यांचा विचार करतील आणि सोबत त्यांची कुटुंबेही याबाबत सजग होतील.
‘लोकशाही भोंडला’ स्पर्धेसाठी सासर-माहेरच्या जागी लोकशाही-हुकूमशाही यांची प्रतीकात्मक रचना करायला आणि त्यांची वैशिष्ट्ये सांगायला खूपच वाव आहे. काही गीतांमध्ये माहेरी जाऊ इच्छिणाऱ्या सुनेला सासू एकेक काम सांगत जाते अन् तिचं माहेरी जाण्याचं स्वप्न लांबणीवर पडतं. याच प्रकारे आधुनिक स्त्रीला कामाच्या धबडग्यात तिची मतदार म्हणून नाव नोंदणी किंवा लग्नानंतर झालेल्या नावात बदल करणे, यासारख्या कामात चालढकल करावी लागते. या गीतांच्या माध्यमांतून तिला यासाठी प्रेरित करणाऱ्या गीतरचना करता येतील.
लोकगीतांच्या अंगभूत लवचीक स्वरूपामुळे त्यामध्ये आधुनिक स्त्रीचं मानस गुंफणंही सहज शक्य आहे. हे मानस गुंफताना तिच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाबरोबरीनेच तिने आपल्या मताधिकाराबाबत जागृत कसं व्हावं, हे सांगता येईल. महिलांनी आपला लोकप्रतिनिधी स्वनिर्णयाने, लोकशाही मूल्यांना प्रमाण मानून गावाच्या देशाच्या विकासाला प्राधान्य देणारा निवडावा, असे आवाहन गीतांद्वारे करता येईल. अधिकाधिक महिलांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.
स्पर्धेची सविस्तर नियमावली मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर पाहता येईल. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी प्रणव सलगरकर (भ्रमणध्वनी-8669058325) यांना संदेश पाठवून संपर्क साधावा.


COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )