पोलीस विभागांनी विकसित केलेल्या क्रिमिनल मॉनिटरिंग इंटेलिजन्स सिस्टीममुळे गुन्ह्यांवर नियंत्रण बसेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

पोलीस विभागांनी विकसित केलेल्या क्रिमिनल मॉनिटरिंग इंटेलिजन्स सिस्टीममुळे गुन्ह्यांवर नियंत्रण बसेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती दि. 25 :- पोलीस विभागांनी विकसित केलेल्या क्रिमिनल मोनिटरिंग इंटेलिजन्स सिस्टीम ( सीएमआयएस) यंत्रणेमुळे गुन्ह्यावर नियंत्रण बसण्यास मदत होईल व पोलीस यंत्रणेची तपास करण्याची कार्यक्षमता वाढेल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण व पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या यंत्रणेच्या उदघाटन प्रसंगी विद्या प्रतिष्ठान येथील व्हिआयआटी हॉल मध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विशेष पोलीस महानिरिक्षक कोल्हापूर परिक्षेत्राचे मनोज लोहिया, अपर पोलीस आयुक्त पिंपरी-चिंचवड डॉ. संजय शिंदे, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक रायगड अतुल झेंडे, अपर पोलीस अधीक्ष्क बारामती मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, नगरपरिषदेच्या अध्यक्षा पौर्णिमा तावरे आदी उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, नव्या यंत्रणेमुळे पोलीसांची तपास करण्याची कार्यक्षमता वाढेल. पोलीसांनी कायद्याच्या चौकटीतच काम करताना कायदा व सुव्यवस्था कशी टिकेल याकडे लक्ष द्यावे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर पोलीसांनी सक्षमपणे व तत्परतेने करावा. संघटित गुन्हेगारी मोडून काढताना पोलीसांचा आणि नागरिकांचा सुसंवाद असला पाहीजे. समाजात अतिशय वाईट घटना घडत असताना सर्वांनी गुन्हे होऊ नये म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. जागरुक नागरिक म्हणून प्रत्येकाने पोलिसांना सहकार्य करावे. सरकार ‘शक्ती’ नावाचा कायदा आणण्याच्या प्रयत्नात आहे. सर्वांनाच सामाजिक सुरक्षा मिळाली पाहीजे यादृष्टीने शासनाचे प्रयत्न आहेत.
सायबर गुन्ह्यांचा तपस वेगाने करण्यासाठी कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे. कोरोना काळात पोलीसांनी केलेल्या चांगल्या कामगिरीचा अभिमान असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले. सीएमआयएस या सॉप्टवेअर चांगला बदल दिसून येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. विशेष पोलीस महानिरिक्षक कोल्हापूर परिक्षेत्राचे मनोज लोहिया म्हणाले, कमी मनुष्यबळात पोलीसांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी हे नवीन पोर्टल काढले आहे. त्याच्यामुळे कमी वेळेत अनेक ठिकाणी गुन्हे करणारे पकडता येतील. कोल्हापूर परिक्षेत्रात या पोर्टलच्या वापर करण्यास सुरुवात करण्यात येईल.
यावेळी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी या यंत्रणेची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. हे सॉप्टवेअर फक्त पोलीस खात्यासाठी असून वापरण्यास अतिशय सोपे आहे. या सॉप्टवेअरमुळे गुन्हेगारांची यादी, सद्यस्थिती, अधिक माहिती, वकीलांची माहिती, जामीन देणारे इत्यादींची माहिती मिळू शकते. प्रत्येक आरोपीच्या घराचे लोकेशनअंतर सहित, आरोपींचा डिजीटल क्रिमीनल फोटो अल्बम, घटक निहाय व गुन्हे पध्दती नुसार गुन्हगारांची यादी व तडीपार गुन्हेगारांची घटक निहाय यादी उपलब्ध होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
सीएमआयएस सॉप्टवेअर बनवणारी आय मार्क टेक्नोलॉजीचे संचालक मंगेश शितोळे यांचा सत्कार श्री. पवार यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक अपर पोलीस अपर पोलीस अधीक्ष्क मिलिंद मोहिते यांनी केले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )