कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते कृषि महाविद्यालयात विविध कामांचा शुभारंभ

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते कृषि महाविद्यालयात विविध कामांचा शुभारंभ

सभागृह बांधकामासाठी १० कोटी रुपयास मान्यता

पुणे, दि.८ : कृषि महाविद्यालयात बांधण्यात आलेल्या १ हजार क्षमतेच्या सभागृहासाठी १० कोटीची मान्यता देण्यात आली असून ६ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सुसज्ज, पायाभूत व मूलभूत सुविधा असलेले सभागृह बांधण्यात यावे, अशा सूचना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या.

कृषि महाविद्यालयात बांधण्यात आलेल्या निवासी इमारत, शेततळे, बेकरीचे उद्घाटन व सभागृहाच्या जागेचे भूमिपूजन कृषिमंत्री सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला कृषि आयुक्त सुनील चव्हाण, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, कृषि परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर उपस्थित होते.

कृषिमंत्री श्री. सत्तार म्हणाले, कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या पाहता मोठ्या सभागृहाची आवश्यकता होती. त्यासाठी आवश्यक असणारा उर्वरित ४ कोटी निधी उपलब्ध करून दिला जाईल. येत्या शैक्षणिक वर्षांपासून प्राथमिक शिक्षणामध्ये कृषि विषयाचा समावेश होणार आहे. मुलींनीही जास्तीत जास्त संख्येने कृषि क्षेत्राकडे वळावे, असेही ते म्हणाले.

कृषि विद्यापीठे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे केंद्र आहेत. सध्या रासायनिक पद्धतीने धान्य पिकवण्याकडे कल वाढताना दिसत आहे. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याची कृषि विद्यापीठांची जबाबदारी आहे. सर्वांना नैसर्गिकरित्या पिकवलेले धान्य मिळाले पाहिजे. यासाठी हे वर्ष पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे केले जात आहे, असे त्यांनी सांगितले.

श्री.सत्तार पुढे म्हणाले, कृषि महाविद्यालयात सुरु करण्यात आलेल्या बेकरीमध्ये स्वच्छ व खात्रीशीर उत्पादने विद्यार्थ्यांना मिळावीत. पुणेकरांसाठी येथील उत्पादनांचा स्टॉल सुरू करावा, अशी सूचना त्यांनी केली.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू श्री. पाटील यांनी मत्स्य प्रात्यक्षिक प्रकल्प, बांधण्यात आलेल्या निवासस्थानाबाबत माहिती दिली.

यावेळी विद्यापीठाचे अधिकारी तसेच कृषि महाविद्यालयाचे विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )