अटल भूजल योजनेअंतर्गत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे निकाल जाहीर ; बारामती तालुक्यातील काऱ्हाटी गावाला जिल्हास्तरीय पहिला पुरस्कार

अटल भूजल योजनेअंतर्गत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे निकाल जाहीर ; बारामती तालुक्यातील काऱ्हाटी गावाला जिल्हास्तरीय पहिला पुरस्कार

पुणे, दि. २४ : अटल भूजल योजना, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा तसेच पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत राबविण्यात आलेल्या भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा- २०२२-२३ चे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये जिल्हास्तरावर बारामती तालुक्यातील काऱ्हाटी या गावाने प्रथम पुरस्कार तर पुरंदर तालुक्यातील सोनोरी आणि चांबळी या गावांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला आहे.

भूजलाच्या अनियंत्रीत उपशामुळे भूजल पातळीत होत असलेली घसरण व बाधित होत असलेली गुणवत्ता थांबवण्याकरीता केंद्र शासन व जागतिक बँक अर्थसहाय्यीत अटल भूजल योजना २६ नोव्हेंबर २०२० पासून महाराष्ट्रात १३ जिल्ह्यात ४३ तालुक्यातील १ हजार १३३ ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येत आहे.

‘लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन’ साध्य होण्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत अटल भूजल योजनेंतर्गत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यातील उत्कृष्ट लोकसहभाग नोंदविणाऱ्या आणि काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना २०२२-२३ आणि २०२३-२४ या दोन आर्थिक वर्षांसाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

ग्रामस्तरावर जलअंदाजपत्रक तयार करणे, भूजल उपलब्धतेतील तूट भरून काढण्यासाठी अस्तित्वातील राज्य व केंद्र पुरस्कृत योजनांचे अधिकाधिक अभिसरण करणे व ग्रामस्तरावरील भूजल उपलब्धतेत शाश्वतता साध्य करणे आदी या योजनेची उद्दीष्टे आहेत.

या स्पर्धेत राज्यस्तरावर प्रथम क्रमांकास १ कोटी रुपये, द्वितीय क्रमांकास ५० लाख रुपये तर तृतीय क्रमांकास ३० लाख रुपये बक्षीस आणि जिल्हास्तरीय प्रथम क्रमाकांस ५० लाख, द्वितीय क्रमांकास ३० लाख तर तृतीय क्रमाकांस २० लाख रूपयांचे बक्षिस वितरण करण्यात येणार आहे.

सन २०२२ -२३ मध्ये पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील २२ ग्रामपंचायती आणि बारामती तालुक्यातील ८ ग्रामपंचायतींनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. सहभाग घेतलेल्या ग्रामपंचयतींची एकूण ५५९ गुणांसाठी स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे मुल्यांकन उपविभाग स्तर, जिल्हास्तर व राज्यस्तर या तीन स्तरावर करण्यात आले, त्यानुसार या स्पर्धेचा निकाल पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव यांनी जाहीर केला आहे, अशी माहिती भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक दिवाकर धोटे यांनी दिली आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )