बारामती:- 8 ऊस खोडवा उत्पादन व ऊस पाचट व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यासाठी उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय बारामती यांच्यातर्फे बारामती, दौंड, इंदापूर व पुरंदर तालुक्यातील सहकारी तसेच खासगी साखर कारखान्यांच्या शेतकी अधिकारी व मुख्य ऊस विकास अधिकारी यांच्यासाठी माळेगाव येथील इंजिनिअरींग कॉलेजच्या शरद सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेस प्रकल्प समन्वयक राष्ट्रीय कृषि विकास योजनेचे डॉ. धमेंद्रकुमार फाळके, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, तंत्र अधिकारी श्री. वाडकर, उपविभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे आदी उपस्थित होते.
यावेळी कार्यशाळेचे डॉ. फाळके यांनी ऊस खोडवा उत्पादन व ऊस पाचट व्यवस्थापनाबाबत चित्रफितीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. खोडवा पिकापासून होणारे फायदे, खोडवा राखण्याची योग्य वेळ, खोडवा पीक घेताना विचारात घ्यावयाच्या बाबी, खोडवा पीक घेताना काय काळजी करावी, तसेच पाचटाची उपलब्धता, पाचट ठेवण्याचे फायदे, पाचट जाळल्यामुळे होणारे तोटे, पाचट कुजविण्याची प्रक्रिया या विषयी त्यांनी माहिती दिली.
यानंतर जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. बोटे म्हणाले की, शास्त्रोक्त पध्दतीने पाचट कुजविण्याविषयी सर्व ऊस उत्पादक शेतक-यांना प्रोत्साहीत करणे आवश्यक आहे. चालू गळीत हंगामात हे उध्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वानी प्रयत्न करुन जमिनीची सुपिकता वाढविण्यावर भर देणे आवश्यक आहे.