बारामती, दि .६ : महारेशीम अभियानाअंतर्गत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा) आणि जिल्हा रेशीम कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने साबळेवाडी येथे आयोजित तुतीवरील उझी माशींचे नियंत्रण व उपायोजना या विषयावर किसान गोष्टी कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी जिल्हा रेशीम अधिकारी संजय फुले, रेशीम मंडळाचे शास्त्रज्ञ वाय हुमायून शरीफ, आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक गणेश जाधव, सरपंच शुभांगी गाढवे, उपसरपंच गणेश साबळे आदी उपस्थित होते.
रेशीम धागा निर्मिती, धाग्यांना रंग देणे, रेशीम कीटकांसाठी खाद्य निर्मिती, बाल्यावस्था कीटक संगोपन, तुतीच्या पाल्यापासून ग्रीन टी निर्मिती, आळ्यांपासून माशांसाठी खाद्य निर्मिती, रेशीम कापड निर्मिती तसेच रेशीम पाल्यांपासून जनावरांसाठी खाद्य निमिर्ती आदी प्रक्रिया उद्योगांविषयी श्री. फुले यांनी मार्गदर्शन केले. रेशीम उद्योगांमध्ये रेशीम कोष निर्मितीपर्यंत शेतकऱ्यांनी मजल मारली आहे. कोष उत्पादनाबरोबरच रेशीम पूरक व्यवसायात विविध संधी असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री. शरीफ यांनी रेशीम उत्पादनामध्ये उझी माशी नियंत्रणाच्याअनुषंगाने माहिती दिली. त्यामध्ये उझी माशींचे जीवनक्रम, एकात्मिक, सापळा, लाईट ट्रॅप पद्धतीने नियंत्रण करण्याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी संकल्प रेशीम शेतकरी बचतगटांचे सदस्य तसेच परिसरातील तुती उत्पादक शेतकरी उपस्थित होते.