पुणे दि.2: कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या कृषी विस्तार सेवा पदविका अभ्यासक्रमाचा (डीएईएसआय- देसी) 2021-2022 या वर्षातील पदविका प्रदान सोहळा वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्था (वामनीकॉम) येथे नुकताच संपन्न झाला.
कृषी मंत्रालय भारत सरकार, राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था (मॅनेज), हैद्राबाद, वनामती नागपूर तसेच कृषी विभाग आत्मा यांच्या मान्यतेने हा एक वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम राबविण्यात येतो. या पदवीप्रदान सोहळ्यास वामनीकॉमच्या संचालक डॉ. हेमा यादव, आत्माचे संचालक दशरथ तांबाळे, कृषी प्रशिक्षण उपसंचालक हनमंत शिंदे, वामनीकॉमचे सहयोगी प्राध्यापक महेश कदम, ‘मॅनेज’चे सल्लागार महेश माने, शाश्वत शेती विकास प्रतिष्ठानचे प्रमुख अवधूत कदम, कार्यक्रम सन्मवय अतुल खुडे आदी उपस्थित होते.
श्री. तांबाळे यांनी कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे कृषी विस्तार सेवेतील महत्व, जबाबदारी आणि योगदान याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. यादव यांनी कृषी निविष्ठा विक्रेत्यांना सहकारी क्षेत्रातील विविध व्यवसाय संधींच्या अनुषंगाने माहिती दिली. अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.