शेळी मेंढी पालन व्यवसायातून आर्थिक समृद्धी- भाग-२

शेळी-मेंढीपालन हा शेतीला पुरक व्यवसाय म्हणून किफायतशीर असा व्यवसाय आहे. ग्रामीण भागात कौटुंबिक अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे काम या व्यवसायाने केले आहे. शेतकरी करत असलेल्या या व्यवसायाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळामार्फत चालना देण्याचे प्रयत्न होत आहेत. लोकर विकास मंडळ, राजे यशवंतराव होळकर महामेष योजना, उपयुक्त वृक्षाची रोपवाटिका व प्रक्षेत्रावर ॲझोला उत्पादन प्रकल्प, शुद्ध लोकरीपासून वस्तू उत्पादन तसेच उत्पादित वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी लोकर वस्तू विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे.

मेंढ्यांची उत्पादकता वाढविण्यासाठी केंद्रीय लोकर विकास मंडळ


राज्यातील डेक्कनी जातीच्या मेंढयांची उत्पादकता वाढविण्यासाठी केंद्रीय लोकर विकास मंडळ पुढे आले आहे. त्याच्या अर्थसहाय्याने बीड, परभणी, नांदेड, औरंगाबाद, जळगाव व सातारा जिल्ह्यातील २ लाख मेंढ्या आणि पुणे, सांगली, सोलापुर, अहमदनगर, धुळे व नाशिक जिल्ह्यातील ३ लाख मेंढया दत्तक घेण्यात आल्या आहेत. मेंढ्यांना आरोग्य सुविधा देण्यात येत आहेत. लसीकरण, जंत प्रतिबंधक औषधोपचार, बाह्य किटक निर्मूलन, आजारी मेंढयांना उपचार, क्षार औषधी आणि मेंढयामध्ये अनुवंशिक सुधारणा करण्यासाठी जातिवंत मेंढेनर पुर्ण अनुदानावर वाटप करण्यात येत आहेत.

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना


मेंढीपालनास प्रोत्साहन देण्यासाठी “राजे यशवंतराव होळकर महामेष योजना” या नावाने योजना राज्यात राबविण्यात येत आहे. ही योजना केवळ भटक्या जमाती (भज-क) प्रवर्गातील लाभार्थींसाठी लागू आहे. २० मेंढया १ मेंढानर स्थायी तसेच स्थलांतरीत पद्धतीने गटवाटप, सुधारित प्रजातीच्या नर मेंढ्यांचे वाटप, मेंढीपालनासाठी पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी असे प्रत्येकी ७५ टक्के अनुदान, मेंढीपालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी अनुदान, कुट्टी केलेल्या हिरव्या चाऱ्यांचा मुरघास बनविण्यासाठी गासडया बांधण्याचे तंत्र खरेदी करण्यासाठी ५० टक्के अनुदान, पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी ५० टक्के अनुदान अस या योजनेच स्वरूप आहे. या योजनेअंर्तगत सर्व लाभधारकांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

उपयुक्त वृक्षाची रोपवाटिका व प्रक्षेत्रावर ॲझोला उत्पादन प्रकल्प


कमी पर्जन्यमान असलेल्या भागात येणारे तसेच शेळ्या मेंढ्यांसाठी उपयुक्त असलेल्या चारा वृक्षाची रोपवाटिका सर्व प्रक्षेत्रावर तयार करण्यात आली आहे. रोपवाटिकेतील रोपे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. महामंडळातर्फे विविध शासकीय योजनेअंतर्गत शेळ्या मेंढ्यांचे गट वाटप करण्याचेही काम सुरू आहे. शेळ्या मेंढ्यांच्या खाद्यावरील खर्च कमी करण्यासाठी, खाद्याची पौष्टीकता वाढविण्याच्या दृष्टीने सर्व प्रक्षेत्रावर अझोला उत्पादन प्रकल्प स्थापन करण्यात आला आहे. सर्व प्रक्षेत्रावर गांडूळखत प्रकल्प स्थापन करण्यात आला आहे.

शुद्ध लोकरी पासून वस्तू उत्पादन


राज्यातील स्थानीक मेंढयापासून उपलब्ध होणाऱ्या लोकरीस बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी पारंपारिक पद्धतीने करण्यात येत असलेल्या लोकर विणकाम व्यवसायाचे जतन तसेच प्रसार करण्याचे काम महामंडळामार्फत होते आहे. स्थानिक मेंढ्यांच्या लोकरीपासून लोकर वस्तू उत्पादनाचे कामही लोकर विणकाम व उपयोगिता केंद्रामार्फत करण्यात येते. महामंडळाच्या या सर्व प्रक्षेत्रावर देशी लोकरीपासून तयार करण्यात आलेल्या लोकर वस्तु विक्रीसाठी उपलब्ध आहेत. घोंगडी, जेन, घडीचे जेन, चादर, सतरंजी, गालीचा, लोकर उशी, शाल, मफलर तसेच चेअर आसन कारपेट या वस्तू विक्रीसाठी आहेत.

शशांक कांबळे, व्यवस्थापकीय संचालक-

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी व मेंढी विकास महामंडळाअंतर्गत पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारालगत लोकर वस्तु विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते नुकतेच या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून लोकर उत्पादने तसेच शेळीचे दूध व पुरक उत्पादने या दालनात विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत.
-जिल्हा माहिती कार्यालय,पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *