बारामती दि. १२: जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत सोपानकाका महाराज यांच्या पालख्या बारामती तालुक्यातून मार्गस्थ होतात. हा आषाढी वारी पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी दिल्या.

प्रशासकीय भवनातील सभागृहात आयोजित आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारी आढावा बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी तहसिलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, माळेगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी स्मीता काळे, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, परीविक्षाधीन नायब तहसिलदार तुषार गुंजवटे आदी उपस्थित होते.

श्री. नावडकर म्हणाले, पालखी सोहळ्यासाठी शुद्ध पिण्याचे पाणी, शौचालय, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्था, वीज, रस्ते, अग्निशमन पथक, आरोग्य सुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध करून देण्यासह पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी बारामती तालुक्यातील सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. भाविकांची कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही यासाठी सर्वच यंत्रणांनी दक्षता घ्यावी. पालखी स्वागताची तयारी चांगल्याप्रकारे करावी.

शुद्ध पिण्याच्या पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यात यावे. त्याची वेळोवेळी तपासणी करण्यात यावी. दवाखान्यांमध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवावा. रस्ता रुंदीकरणामध्ये गावाच्या पाट्या गेल्यामुळे पाट्या लावाव्यात. सोहळ्याच्या नियोजनाशी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक तहसील कार्यालयात द्यावेत. सर्व यंत्रणांनी पालखी सोहळ्याचे चांगल्यापद्धतीने नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी मुख्याधिकारी श्री. रोकडे, गट विकास अधिकारी श्री. बागल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. खोमणे, पोलीस निरीक्षक सचिन काळे यांनी त्यांच्या विभागाकडून पालखी सोहळ्यासाठी केलेल्या नियोजनाविषयीची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed