प्रतिनिधी – ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट मधील शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी बुधवार दिनांक 6 जुलै रोजी प्रत्यक्ष वारीचा अनुभव घेतला.या बालचमुंच्या वारीमध्ये टाळकरी, ध्वजधारी, विणेकरी, तुळशीवाल्या महिला, त्याचबरोबर वारकऱ्यांच्या संपूर्ण पोशाखामध्ये विद्यार्थ्यांनी संपूर्ण संकुलामध्ये पायी चालत वारी केली. असं म्हणतात, पाऊले चालती पंढरीची वाट ‘ प्रत्यक्ष हा अनुभव या वारीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी घेतला.
या वारीची सुरुवात ग्रंथ दिंडी, जलदिंडी आणि वृक्षदिंडी यांच्या विधिवत पूजेने झाली विशेष म्हणजे ही पूजा पालकांच्या हस्ते करण्यात आली. तसेच गोल रिंगण, भजन, भारुड,आरती त्याचबरोबर वारकरी खेळतात त्या प्रकारचे विविध खेळ मुलांनी खेळले. त्याचबरोबर सामाजिक संदेश देणारी घोषवाक्य देखील यावेळी मुलांनी वारीच्या माध्यमातून प्रदर्शित केली सकाळी आठ वाजता प्रस्थान केलेली ही दिंडी दुपारी एक वाजता पुनश्च विद्यालयांमध्ये आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सुश्राव्य अशा ह. भ. प. शंभूराजे जाधव या बाल कीर्तनकार (वय वर्षे दहा) याचे कीर्तन ऐकले. त्यानंतर महाप्रसाद घेऊन विद्यार्थी भगवंताच्या नामाचा जयघोष करीत आपापल्या घरी परतले.
या माध्यमातून या शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांना या वारीच्या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्यक्ष समाजामध्ये जे वारकरी दिंडीमध्ये सहभागी होतात त्यांची वेशभूषा ,त्यांचे विचार, त्यांचे बोलण्याची पद्धत त्याचबरोबर विविध खेळाच्या माध्यमातून त्यांची शरीरातील काटकता, अभंगाच्या माध्यमातून वारकऱ्यांचे गायन तसेच दिंडीमध्ये चालत असताना शिस्तप्रियपणा,एक संघपना या सर्वांचे मूल्य रुजवणे हाच एक प्रमुख हेतू होता. यावेळी पालकांनी देखील सक्रिय सहभाग नोंदवला त्याचबरोबर विद्यार्थ्यांना विसाव्याच्या ठिकाणी खाऊचे वाटपही पालकांतर्फे करण्यात आले.
या सर्व उपक्रमाचे कौतुक संस्थेचे चेअरमन मा.राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार, संस्थेचे सीईओ नलावडे, समन्वयक तनपुरे, संस्थेच्या एच.आर गार्गीताई तसेच मुख्याध्यापक मुंढे व वाघ यांनी भरभरून कौतुक केले.