राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते बोराटवाडी व खोरोची परिसरात विविध विकासकामांचे भूमिपूजन

बारामती, दि.१६:  राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या  हस्ते इंदापूर तालुक्यात  बोराटवाडी व खोरोची परिसरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन रविवारी सायंकाळी  करण्यात आले.

  बोराटवाडी येथील नीरा नदीवरील पूल बांधणे (१६ कोटी), खोरोची येथील नीरा नदीवरील पूल बांधणे (१२ कोटी), खोरोची राष्ट्रीय पेयजल योजना लोकार्पण (१ कोटी ५६ लाख), बोराटवाडी व खोरोची येथील इतर विविध विकास कामे अशा व इतर एकूण ३३ कोटी ५९ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व उदघाटन यावेळी करण्यात आले.

    कार्यक्रमाला जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, पदाधिकारी, बोराटवाडी व खोरोची गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.    

   राज्यमंत्री भरणे यावेळी म्हणाले, राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत हर घर जल योजनेच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यात येईल. इंदापूर तालुक्यात विविध ठिकाणी विकास कामे होत असून  विकासकामांसाठी लागणारा निधी कमी पडू दिला जाणार नाही.

    गोरगरीब, अल्पसंख्याक,  मागासवर्गीय नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी व त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. परिसरातील २२ गावांमधील शेतीच्या पाण्याची समस्या कायमची दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.  तालुक्यातील विकासाचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणार असल्याचे त्यांनी यावेळी  सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *