बारामती दि. 28: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कृषी विभाग, आत्मा पुणे व कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’ अभियानातर्गत शारदानगर येथील आप्पासाहेब पवार सभागृहात 26 एप्रिल रोजी शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला.
यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट चे चेअरमन राजेंद्र पवार, बारामतीचे तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांच्यासह दौंड, इंदापूर, पुरंदरचे तालुका कृषी अधिकारी अनुक्रमे राहुल माने, भाऊ रुपनवर, सुरज जाधव, पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे ऊस संशोधक डॉ. भारत रासकर, कृषी विज्ञान केंद्र बारामती चे प्रमुख डॉ.रतन जाधव, संतोष गोडसे आणि बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर, वेल्हा व हवेली तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी राजेंद्र पवार म्हणाले, पिकाच्या उत्पादकतेमध्ये वाढ व्हावी यासाठी ठिबक सिंचन तंत्रज्ञानाचा वापर योग्य प्रकारे करावा. पाडेगाव केंद्रामध्ये ऊसावर संशोधन करून शोधण्यात आलेले नवीन वाण शेतकऱ्यांनी ते पाहावे आणि चांगल्या वाणाची लागवड करावी.
श्री. पवार पुढे म्हणाले, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून परिसरातील काही शेतकरी फळभाज्या उत्पादनातून लाखो रुपये उत्पन्न मिळवतात ही चांगली बाब आहे. अन्य शेतकऱ्यांनीही हे ज्ञान आत्मसात करावे. शेतीचे शास्त्र समजून घेऊन शेती केल्यासच शेती परवडेल. पिकांसाठी योग्य वेळी योग्य बियाणे, टॉनिक, खते, औषधे वापरणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन कराव्यात त्यामुळे कृषी मालाची योग्य विक्री होईल, असे आवाहनही त्यांना केले.
डॉ. रासकर म्हणाले, पाडेगाव संशोधन केंद्रातील उसाचे नवीन वाणाचे थोडे बियाणे घेऊन बेणे प्लॉट तयार करावा. एक ऊस शंभर रुपये प्रमाणे दिला जाईल. ऊस पिकाला मार बसू नये यासाठी उसामध्ये कमी उंचीची आंतरपिके घ्यावीत. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढी करता प्रयत्न करावे. त्यासाठी तागासारख्या पिकाची लागवड करावी, असेही ते म्हणाले.
कृषी विज्ञान केंद्राचे संतोष करंजे यांनी तेलबिया उत्पादन व विक्री बाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, सोयाबीन बीबीएफ ने लागवड करावी व आपल्या भागाकरीता योग्य वाण लावावा. लागवड अंतर योग्य ठेवल्यास एकरी 18 क्विंटल सोयाबीन उत्पादन घेता येईल. एरंडी सारखे नवीन पीक हरभऱ्यात आंतरपीक घेतल्यास निव्वळ नफा जास्त मिळतो, असेही ते म्हणाले.
नैसर्गिक शेती तज्ज्ञ शेतकरी मिलिंद सावंत यांनी त्यांच्याकडे असलेल्या शंभर प्रकारची देशी बियाणे त्यांच्या बियाणे बँकेत आहेत असे सांगितले. तसेच मध्यस्त मुक्त स्वावलंबी विक्री व्यवस्था करून नैसर्गिक शेती केल्याचे सांगितले. ते स्वतः नैसर्गिक रित्या खते व औषधे बनवतात व ग्राहकांना विषमुक्त अन्न पुरवतात.
उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी विविध शेतीपूरक योजनांची माहिती दिली. कार्यक्रमात केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचा लाईव्ह कार्यक्रम दाखविण्यात आला.
नाथसण शेतकरी कंपनीचे चेअरमन नितीन तावरे यांनी फार्मर प्रोड्यूसर कंपनी बद्दल माहिती दिली. महेश लोंढे यांनी भरड धान्य उत्पादन व प्रक्रिया बाबत मार्गदर्शन केले तर कमी खर्चातील शीतगृहाबाबत सुरेश तुरुमारे यांनी माहिती दिली. दिव्य ज्योती जागृती संस्थान पंजाब येथील स्वामी मनेश्वरा व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी असणाऱ्या 200 एकरावरील फळ, भाजीपाला व सेंद्रिय शेतीची माहिती दिली.