दि.२२, सोमेश्वरनगर- नेहरु युवा केंद्र, पुणे (युवक कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार) व मु. सा. काकडे महाविद्यालय, सोमेश्वरनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युवा संसद २०२२’ चे आयोजन करण्यात आले . युवकांना एक संस्थात्मक व्यासपीठ तयार व्हावे, विविध शासकीय योजनांची माहिती व्हावी तसेच त्यांना अनेक सामाजिक, राजकीय प्रश्नांची जाणीव व्हावी या उद्देशाने युवा संसदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमप्रसंगी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजित काकडे यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये बोलताना “युवकांनी राजकारणात समाजकारणाला अधिक महत्त्व दिले पाहीजे तरच पुढील पिढी राजकारणात येण्यासाठी स्वारस्य दाखवेल.” असे प्रतिपादन केले. यावेळी बारामती पंचायत समिती सभापती निता फरांदे यांनी “या अभिरुप संसदेच्या आयोजनामुळे ग्रामिण भागातील युवक युवतींना संसदीय कामकाजाचे स्वरुप समजण्यास मदत होणार आहे.”असे प्रतिपादन करुन शुभेच्छा दिल्या. तसेच वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे साहाय्यक पोलिस निरिक्षक सोमनाथ लांडे यांनी “गुन्हेगारी जर थांबवायची असेल तर युवकांमध्ये सामाजिक भान निर्माण गरजेचे आहे.” असे प्रतिपादन करून नेहरु युवा केंद्र व काकडे कॉलेज यांच्या माध्यमातून होत असलेल्या उपक्रमांबद्दल कौतुक केले आणि या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयाचे ९ विद्यार्थी पोलीस दलात भरती झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
पानी फाउंडेशन बारामती तालुका समन्वयक पृथ्वीराज लाड यांनी बोलताना “जिरायती भागातील पानी प्रश्न गंभीर स्वरुपाचे होते परंतु लोकप्रतिनिधी व इतर संस्थांच्या माध्यमातून जलसंधारण्याच्या कामांमुळे प्रश्न सुटलेले आहेत, युवकांनीदेखील या अभिरुप संसदेमध्ये पाणी समस्येबाबत प्रश्न मांडावेत.” अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच प्राचार्य डॉ.देविदास वायदंडे यांनी युवकांना समाजकारण, राजकारण व संसदेच्या कामकाजाविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती येथील विद्यार्थी- विद्यार्थिनींचा संघ या अभिरुप युवा संसदेच्या कामकाजात सहभागी झाला होता.
याप्रसंगी रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.अच्युत शिंदे, स्पर्धा परिक्षा समन्वयक डॉ.नारायण राजुरवार, उपप्राचार्य डॉ.प्रविण ताटे, उपप्राचार्य डॉ.जगन्नाथ साळवे, उपप्राचार्या डॉ.जया कदम, उपप्राचार्य प्रा.रवींद्र जगताप आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सोमनाथ कदम यांनी, प्रास्ताविक नेहरु युवा केंद्राचे प्रतिनिधी वैभव भापकर यांनी तर आभार नेहरू युवा केंद्राचे प्रतिनिधी धिरज वायाळ यांनी मानले. कार्यक्रमाची सुरवात राष्ट्रगिताने व संविधान प्रस्ताविकाच्या वाचनाने तर समारोप ‘वंदे मातरम’ गिताने करण्यात आला.