पुणे दि.१: जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लघु उद्योजकांना राज्य शासनामार्फत जिल्हा स्तरावर देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राकडून करण्यात आले आहे.
जिल्हा पुरस्कारासाठी उद्योग हा स्थायी लघु उद्योग म्हणून उद्योग संचालनालयाकडे मागील तीन वर्ष नोंदणीकृत असावा, तसेच उद्योग घटक मागील दोन वर्षे सलग उत्पादन प्रक्रियेतील असावा. लघु उद्योग कोणत्याही संस्थेचा तसेच बँकेचा थकबाकीदार नसणे आवश्क आहे.
जिल्हा पुरस्कार प्रथम क्रमांकास १५ हजार रूपये व द्वितीय पुरस्कार १० हजार रूपये व मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारासाठी शासनाने विहीत केलेल्या निकषाप्रमाणे लघु उद्योगांची निवड करण्यात येणार आहे.
विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा उद्योग केंद्राकडे विनामूल्य उपलब्ध आहे. अर्जासाठी तसेच पुरस्काराच्या अधिक माहितीसाठी महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र पुणे यांचे कार्यालय, कृषि महाविद्यालय आवार, शिवाजीनगर, पुणे (दूरध्वनी क्रमांक ०२०-२५५३७५४१/ २५५३७९६६) या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.