माळेगाव प्रतिनिधी(गणेश तावरे)
राजभाषा हिंदीच्या प्रगतीशील वापराला प्रोत्साहन देण्यासाठी १४ ते २८ सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था बारामतीमध्ये हिंदी पंधरवडा १४-२८ सप्टेंबर या काळात आयोजित करण्यात आला. १४ सप्टेंबर रोजी संस्थेचे संचालक डॉ. हिमांशू पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदी दिवस आणि हिंदी पंधरवड्याचे उदघाटन करण्यात आले. उदघाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.सविता नाईक-निंबाळकर (सहयोगी प्राध्यापक, मुधोजी महाविद्यलय, फलटण जिल्हा सातारा) उपस्थित होत्या. हिंदी साहित्याच्या उदय आणि विकासाबद्दल त्यांनी सर्वांना जागरूक केले. हिंदी पंधरवड्यात विविध स्पर्धा आयोजित केल्या यामध्ये प्रामुख्याने निबंध लेखन (हिंदी भाषिक / बिगर हिंदी भाषिकांसाठी), नोट लेखन, टाइपरायटिंग, कविता वाचन, हिंदी अनुवाद, तत्काल भाषण, प्रश्नमंजुषा इत्यादी स्पर्धाचा समावेश होता. संस्थेच्या सर्व सदस्यांनी स्पर्धांमध्ये उत्साहाने भाग घेऊन स्पर्धा यशस्वी केल्या. २८ सप्टेंबर रोजी संस्थेच्या सरदार पटेल सभागृहात हिंदी पंधरवड्याचा समारोप समारंभ आणि पारितोषिक वितरण आयोजित केले गेले. समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे श्री ता का सूर्यवंशी (माजी प्राचार्य, राजमाता सुमित्राजे भोसले विद्यालय, सातारा) यांनी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरवले. प्रमुख पाहुण्यांनी हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून किती महत्त्व आहे याची जाणीव करून दिली. राजभाषा अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष डॉ.हिमांशू पाठक यांनी हिंदीच्या प्रचारासाठी योग्य प्रयत्न करण्याचे आवाहन केले. डॉ.वनिता साळुंखे (सदस्य सचिव, राजभाषा अंमलबजावणी समिती), डॉ.संग्राम चव्हाण, डॉ.विजयसिंह काकडे, डॉ.प्रविण तावरे, डॉ.अविनाश निर्मले, डॉ.परितोष कुमार इत्यादींनी कार्यक्रमाचे आयोजन केले आणि कार्यक्रम यशस्वी केला.