बारामती, दि. ९: कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने शेततळ्यातील मत्स्यपालन या विषयावर कृषी विज्ञान केंद्र येथे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक विजय हिरेमठ व तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख धीरज शिंदे, मत्स्य विभागाचे चंद्रकांत दाते, विषय विशेषज्ञ पशुसंवर्धन रतन जाधव, आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक गणेश जाधव आदी उपस्थित होते.
श्री. दाते म्हणाले, शेतकऱ्यांनी प्रात्यक्षिक आधारित शेततलावाच्या आकारमानानुसार आणि मत्स्य बीज वाढीच्या कालावधी नुसार मत्स्य बीजाच्या खाद्याचे नियोजन करावे. एकंदरीत येणारा उत्पादन खर्च, उत्पादित मालाचे विक्री व्यवस्थापन आणि शेततलावाकडे कृषीपूरक व्यवसाय बघितल्यास आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांना होणारा फायदा याबाबतही श्री. दाते यांनी मार्गदर्शन केले.
श्री. शिंदे आणि श्री. जाधव यांनी शेततळ्यातील मत्स्यपालनाचे महत्त्व समजावून सांगितले.
बारामती कृषी विज्ञान केंद्र येथे रोहू, कटला, मृगळ, तिलापिया या प्रकारचे मत्स्यबीज विक्रीसाठी उपलब्ध आहे. आत्म्याच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांना देखील प्रायोगिक तत्त्वावर त्यांच्या शेततळ्यामध्ये मत्स्यबीज सोडण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत असून शेतकऱ्यांच्या तलावावरही प्रात्यक्षिक राबविण्यात येणार आहे.
तालुक्यातील शेततळ्यांची संख्या पाहता हा एक अतिरिक्त उत्पन्नाचा स्त्रोत शेतकऱ्यांमध्ये विकसित होऊ शकतो जेणेकरून शेतकऱ्याचे आर्थिक जीवनमान उंचावण्यास मदत होईल.