2019 साली आलेल्या कोरोनामुळे शहरामधून गावाकडे आलेले अनेक महाराष्ट्रातील तरुण दूध धंद्याकडे वळले व व्यवसाय म्हणून याकडे पाहू लागले. अनेकांचा मुख्य आधारही हा व्यवसाय बनला पण आता यामध्ये खूप मोठया प्रमाणामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत. आधीच नैसर्गिक संकटामुळे वेगवेगळ्या आजारांनी या व्यवसायाला कवटाळले आहे. मोठ्या प्रमाणाध्ये गाई, म्हैशी आजारी पडत आहेत. यामुळे दुग्ध उत्पादक हैराण झाले आहेत त्यामध्येच शासनाच्या या व्यवसायाकडे बघन्याच्या दृष्टिकोनामुळे व धोरणामुळे उत्पादक पूर्णपणे कोलमडून पडले आहेत.
मध्यंतरी दुधाला चांगला दर मिळत असल्याने आशा निर्माण झाली होती पण आता एकीकडे ते दर कमी होऊ लागले आहेत व दुसरीकडे पशुखाद्याचे दर गगनाला भिडले आहेत ते अजूनही वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे व्यवसाय करायचा कसा या चिंतेमध्ये दुग्ध उत्पादक आहेत यावर नियंत्रण असणे खूप गरजेचे आहे.पशुखाद्यामध्ये वारंवार होणाऱ्या दरवाढेमुळं उत्पादन व खर्च याचा ताळमेळ बसेनासा झाला आहे व दूध धंदा तोट्यामध्ये जाऊ लागला आहे. चाऱ्याचा खर्च, पशुखाद्याचा खर्च व वाढलेले आजारपण यामुळे दुग्ध व्यवसाय करायचा कसा हा प्रश्न दूध उत्पादक शेतकऱ्यांपुढे आहे. यामुळे दुधाला किमान 35 रुपये हमीभाव मिळाला पाहिजे व पशुखाद्याचे दर कमी होणे गरजेचे आहे.
दुधाला किमान 35 रुपये दर कायम राहणे गरजेचे आहे तरच हा व्यवसाय टिकू शकतो. तसेच दुधामध्ये होणारी भेसळ थांबवली तर दूध दर 40 रुपयांपर्यंत जाऊ शकतो असे उत्पादकांचे म्हणणे आहे त्यामुळं शासनाने याचा गांभीर्यपूर्वक विचार करण्याची गरज आहे.
शेतकरी – अक्षय मिंड-पाटील
टाकळवाडे ता. फलटण जि. सातारा.