देऊळगाव रसाळ (प्रतिनिधी,दिपक वाबळे) दि 9: बारामती तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून केलेल्या कामांचे सामाजिक अंकेक्षण (सोशल ऑडिट) करण्यात येणार आहे. त्याबाबतची कार्यशाळा आज तहसिलदार विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय भवनातील सभागृहामध्ये पार पडली. तहसिलदार विजय पाटील यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करुन बारामती तालुक्यातील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत केलेल्या कामांची माहिती देवून ते म्हणाले, बारामती तालुक्यातील 90 ग्रामपंचायतीमध्ये या योजनेअंतर्गत कामे झाली आहेत त्याचे तीन टप्प्यामध्ये सामाजिक अंकेक्षण होणार आहे. अंकेक्षण करणारी टीम ही गावपातळीवरच नियुक्त केली जाईल. गावामध्ये जे शिक्षित तरुण आहेत त्यांची अंकेक्षणासाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. ते ग्रामसेवकांचे आणि ग्रामपंचायतीच्या सदस्यांचे जवळचे नातेवाईक नसावेत. अंकेक्षणाची पहिली फेरी 17 ते 22 सप्टेंबर, दुसरी फेरी 24 ते 29 सप्टेंबर आणि तिसरी फेरी 1 ते 6 ऑक्टोबर 2021 दरम्यान होणार आहे. सर्व ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी व रोजगार सेवकांनी अंकेक्षणाच्या वेळी त्यांचे दप्तर सादर करावे, ऑडिटच्या अगोदर मुद्दे काळजीपूर्वक तपासूण घ्यावे, तांत्रिक, प्रशाकीय मान्यता घेतल्या आहेत किंवा नाही याची खातरजमा करावी, कामाचे जॉब कार्ड, फोटो व इतर अनुषंगीक कागदपत्रांची एकच फाईल तयार करण्यात यावी, जी कामे झाली नाहीत ती ऑडिट मध्ये घेण्यात येवू नयेत, सर्व ग्रामसेवकांनी व रोजगार सेवकांनी चांगल्या प्रकारे कामे करावीत, अंकेक्षणाचे वेळी ग्रामपंचायतींच्या सदस्यांना विश्वासात घ्या, काही अडचण असल्यास अेपीओ यांना विचारा अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी जिल्हा साधन व्यक्ती राहूल जोगदंड यांनी सामाजिक अंकेक्षण म्हणजे काय? सामाजिक अंकेक्षणाची उद्दिष्टे, वित्तीय अंकेक्षण व सामाजिक अंकेक्षणामधील फरक, घटक, मार्गदर्शक तत्वे, कायाद्याचा आधार, लाभार्थीचा सहभाग, निवड समिती, ग्राम साधन व्यक्ती, प्रक्रिया, अंकेक्षण आणि कृती अहवाल, पडताळणी करावयाचे दस्तावेज, अंकेक्षण प्रकियेदरम्यान आढळलेल्या बाबी व कार्यवाहीचे मुद्दे इत्यादी माहिती सादरीकरणाद्वारे दिली. गटविकास अधिकारी अनिल बागल यावेळी म्हणाले की, सामाजिक अंकेक्षणापूर्वी सर्व ग्रामसेवकांनी व रोजगार सेवकांनी त्यांचे दस्ताऐवज तयार ठेवावेत. सन 2020-2021 मध्ये झालेल्या कामांचीच फाईल सादर करावी.
यावेळी गट विकास अधिकारी अनिल बागल, जिल्हा साधन व्यक्ती राहूल जोगदंड, विलास गजभे, जिल्हा रेशीम अधिकारी एस. एम. आगवणे, विस्तार अधिकारी पंचायत समिती बारामती डी. डी. खंडागळे, तहसिल कार्यालयातील कर्मचारी, बारामती तालुक्यातील ग्रामसेवक, रोजगार सेवक व सामाजिक अंकेक्षणाच्या यंत्रणेचे कर्मचारी उपस्थित होते.