बारामती ( प्रतिनिधी, गणेश तावरे ) दि.6 – नेत्रदान ही संकल्पना हळूहळू लोकांमध्ये रुजू लागली आहे. अनेक लोक मरणानंतर नेत्र दान करणे हा संकल्प सध्या करत आहेत. आपल्या डोळ्यांमुळे एखाद्याची दृष्टी परत येऊ शकते असा विचार करणारे लोक वाढत असून नेत्रदान चळवळ उभी राहू लागली आहे. बारामती मध्ये गेल्या दोन दिवसात बंगलोरमध्ये नेत्रदान केलेल्या एका दात्याचे नेत्र बारामती मध्ये ऑपरेशन करून यशस्वीपणे शस्रक्रिया करून उपचार घेता आले. याबाबत सविस्तर बातमी अशी की……..
लंडन येथुन शिक्षण घेऊन बारामती मध्ये वास्तव्यास असलेले डॉ.हर्षल राठी यांनी बारामती मधील पहिले लामेलर कॉर्नेअल ट्रान्सप्लांट (बुबुळ प्रत्यारोपण) करण्याचा मान डॉ राठी यांनी मिळविला आहे. या शस्त्रक्रियेमध्ये पूर्ण बुबुळ बदलण्याऐवजी बुबुळातील फक्त रोगग्रस्त थर बदलला जातो, त्या मुळे नजर जास्त स्पष्ट वाढते. अश्या जटिल व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी आज पर्यंत बारामतीकरांना हैदराबाद किंव्हा चेन्नई सारख्या ठिकाणी जायला लागत असे. बुबुळ संबंधित सर्व आजारांवर बारामती मधेच योग्य व अत्याधुनिक उपचार मिळणार असल्या मुळे गरजू लोकांना नक्कीच त्याचा फायदा होईल. अशी प्रतिक्रिया डॉ राठी यांनी दिली आहे. डोळ्यांच्या अवघड शस्त्रक्रिया करण्यासाठी महाराष्ट्र बाहेर जावे लागत असे त्यानंतर पुण्यामध्ये ही सुविधा हळूहळू उपलब्ध होऊ लागली, त्यातच बारामतीमध्ये हे ऑपरेशन यशस्वी रित्या पूर्ण झाल्यामुळे नक्कीच भविष्यामध्ये जवळपासच्या जिल्ह्यांमधील रुग्णांना याचा अवश्य लाभ होणार आहे. बारामती मधील वैद्यकीय क्षेत्रासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *