ड्रोन सर्व्हेमुळे गावठाण भूमापनात अचुकता येणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती दि. 04 :- ड्रोन सर्व्हेमुळे गावठाण भूमापनात अचुकता येईल. प्रत्येक धारकाच्या जागेचा आणि मिळकतीचा नकाशा तयार होईल, या माध्यमातून सीमा निश्चित होतील, त्याचा फायदा वैयक्तिक धारकासह ग्रामपंचायतीला होईल, त्यामुळे गावाच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केला.

ग्रामविकास विभाग, जमाबंदी आयुक्त, महराष्ट्र राज्य व भारतीय सर्वेक्षण विभाग, डेहराडून यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती तलुक्यातील गावठान भूमापन ड्रोन सर्व्हे कामाचा शुभारंभ कटफळ येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख महाराष्ट्र राज्य एन. सुधांशु, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे आयुष प्रसाद, उपसंचालक भूमि अभिलेख किशार तवरेज, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख सुर्यकांत मोरे, अपर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी अनिल बागल, उप अधिक्षक भूमि अभिलेख गणेश कराड, कटफळ गावचे सरपंच पुनम किरण कांबळे, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, स्वामीत्व योजनेअंतर्गत गावठाणचे भूमापण ड्रोनच्या सहाय्याने करण्यात येत आहे. आज बारामतीमध्ये मौजे कटफळ येथे या योजनेचा सुभारंभ होत आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. या योजनेचा फायदा सर्वच गावठानाला मिळणे आवश्यक आहे. 1890 साली ब्रिटीशांनी मोजनीची अंमलबजावणी सुरु केली. त्यांना हे काम पूर्ण करण्यास 37 वर्षे लागलीत. आजच्या काळात ड्रोनच्या सर्व्हेमुळे भूमापनामध्ये येणा-या अडचणी कमी होतील. गावांचा विकास वाढेल, ड्रोन सर्व्हेनंतरही अडचणी वाटल्यास ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क करावा व शंकांचे निराकारण करुन घ्यावे. ग्रामस्थांनी भूमापनात अडथळा आणू नये, योग्य प्रकारे सर्व्हेक्षण करुन घ्यावे . प्रत्येक गावाचा डिजीटल नकाशा तयार करुन घ्यावा व सर्व्हेक्षण यंत्रनेला सर्वांनीच सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

बारामती तालुक्यात एकूण 118 गावे असून यापूर्वी 47 गावांचे नगर भूमापन झालेले असून उर्वरित 71 गावांपैकी 18 गावे यांना मूळ गावठाण नाही त्यामुळे फक्त 53 गावांचे नगर भूमापन करण्यात येऊन त्यांना मिळकत पत्रिका देण्यात येतील, अशी माहिती उप अधीक्षक भूमी अभिलेख गणेश कराड यांनी दिली.

तसेच यावेळी उपसंचालक भूमि अभिलेख पुणे प्रदेश किशोर तवरेज यानी स्वामीत्व योजनेच्या कार्यकक्षेबाबत माहिती दिली.

गावठाण भूमापन ड्रोन सर्व्हेची प्रमुख वैशिष्ट्ये

योजनेमुळे नागरिकांना होणारे फायदे

• प्रत्येक धारकांच्या जागेचा आणि मिळकतीचा नकाशा तयार होईल, या निमित्तानं सीमा निश्चित होतील आणि मिळकतीचे नेमके क्षेत्र माहिती होईल.
• प्रत्येक धारकाला मिळकतीची मालकी हक्क संबंधी मिळकत पत्रिका आणि सनद मिळेल.
• गावठाणातील जागेच्या मिळकत पत्रिकेत शेतीच्या 7/12 प्रमाणेच धारकाच्या मालकी हक्काचा पुरावा म्हणून कायदेशीरदृष्ट्या मान्यता मिळणार आहे.
• मिळकत पत्रिके आधारे संबंधित धारकास बँक कर्ज उपलब्ध होऊ शकते, तारण करता येईल, जामिनीचा मालक म्हणून राहता येईल आणि विविध आवास योजनांचे लाभ घेता येतील.
• बांधकाम परवानगीसाठी आवश्यक असणारी मिळकत पत्रिका उपलब्ध होणार आहे.
• सीमा माहिती असल्यामुळे धारकांना आपल्या मिळकतींचे संरक्षण करता येईल.
• गावठाणातील जमीन विषयक मालकी हक्कांबाबत व हद्दींबाबत निर्माण होणारे वाद संपुष्टात आणण्यास गावठाण भूमापन नकाशे व अभिलेखांचा उपयोग होईल.
• मिळकती संबंधी बाजारपेठेत तरलता येऊन आर्थिक पत उंचावेल.

योजनेमुळे ग्रामपंचायतींना होणारे फायदे

• गावठाणातील प्रत्येक मिळकतीचे मालकी हक्काचे अभिलेख मालमत्ता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड) तयार होईल.
• ग्रामपंचायतीला गावातील कर आकारणी, बांधकाम परवानगी, अतिक्रमण निर्मुलन यासाठी अभिलेख आणि नकाशा उपलब्ध होईल. त्यामुळे नियोजन करण्यास सुलभता येईल.
• ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्ता या मालमत्ताकराच्या व्याप्तीत येतील, त्यामुळे ग्रामपंचायत महसुलात वाढ होईल.
• ग्रामपंचायतीकडील मालमत्ता कर निर्धारणपत्रक (नमुना नोंदवही) आपोआप, स्वयंचलनाने तयार होईल. हस्तांतरणाच्या नोंदी अद्ययावत करणे सहज, पारदर्शक आणि सुलभ होईल.
• गावठाणाच्या हद्दीतील ग्रामपंचायत मिळकत, शासनाच्या मिळकती आणि सार्वजनिक मिळकती, जागा तसेच प्रत्येक मिळकतीच्या सीमा आणि क्षेत्र निश्चित होतील. ते जनतेस माहितीसाठी उपलब्ध होतील. त्यामुळे गावठाणातील मिळकतींचे हद्दी व क्षेत्राचे वाद कमी प्रमाणात उद्भवतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *