बारामती ( प्रतिनिधी, गणेश तावरे )
हवामान बदल आणि बाजारपेठेतील कृषीमालाचे कोसळणारे दर पाहून शेतकरी शाश्वत शेतीकडे वळू लागला आहे. होणार्या वातावरण बदलांमध्ये बहुवार्षिक शेतीमध्ये चन्दन, बांबू व नुकतेच आलेले ड्रॅगन फ्रूट यांच्या शेतीकडे वाढलेला कल लक्षात घेता, भारतीय कृषि अनूसंधान परिषदेच्या राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था (नियासम), बारामती ने चन्दन व ड्रॅगन फ्रूट या दोन्ही वनस्पतींवरती संशोधन सुरू केले आहे. याच्याच अंतर्गत या दोन्ही वनस्पतींची लागवड संशोधन प्रक्षेत्रावरती करण्यात आली आहे.
चंदन हे सुमारे ३००० वर्षापासून धार्मिक विधीमध्ये व आयुर्वेदामध्ये वापरले जाते. चंदनापासून अत्यंत मौल्यवान तेल आणि सुगंधित लाकडासाठी जगप्रसिद्ध आहे. याचबरोबर बाजारपेठेतील वाढणारी मागणी, आकाशाला भिडणार्या किमती, कॉस्मेटिक आणि औषध उद्योगासाठीची मागणी हे चंदन लागवडीस पोषक वातावरण निर्मिती करू लागले आहेत. शास्त्रीय पद्धतीने चंदनाची लागवड शेतकर्यांना करता येण्यासाठी नियासम संस्थेमध्ये डॉ संग्राम चव्हाण व त्यांचा टिमने चंदनाचे परजीवी स्वरूप, पर-वृक्षावरती अवलंबण व यजमान वृक्षांची योग्य निवड, चंदन आणि यजमानवृक्ष यांचे प्रमाण, रोपण पद्धती आणि व्यवस्थापन या बाबींवरती वैज्ञानिक ज्ञानाचा अभाव असल्यामुळे सखोल संशोधन सुरू केले आहे. तसेच शेतकर्यांकडे असणार्या पूर्व-स्थापित फळ बागा जसे की डाळिंब, चिंच, आंबा, मेलीय डुबिया यांच्या बरोबर लागवड करून पडीक व निकृष्ट जमीनिमध्ये चंदनाच्या वाढीचा सखोल अभ्यास करण्याचे उद्दिशले आहे. याच्याच अनुशंघाने चंदन लागवडीचा कार्यक्रम आजोजित केला होता. यावेळी संस्थेचे संचालक डॉ. हिमांशु पाठक म्हणाले की भारतीय संस्कृतीमध्ये चंदन हे हजारो वर्षांपासून वापरण्या येत आहे व याची व्यावसायिक लागवड पडीक व निकृष्ट जमीनिमध्ये करून एकूण उत्पन्न वाढविण्यासाठी वनशेतीच्या माध्यमातून नियासम प्रयत्न करत आहे.
याचबरोबर ड्रॅगन फ्रूटच्या वेगवेगळ्या प्रजातींची लागवड करण्यात आली. नियासम बारामतीमध्ये ड्रॅगन फ्रूटच्या वेगवेगळ्या जातींवरती संशोधनाचे कार्य सुरू आहे. तरी पांढर्या गराच्या 3 व लाल गराच्या 3 जातीची लागवड केली आहे याची माहिती डॉ. विजय काकडे व त्यांच्या टिमने दिली. या वाणांचा उपयोग बदलत्या वातावरणातील घटकांचा परिणाम ड्रॅगन फ्रूट मध्ये कश्या पद्धतीने होत आहे यावरती संशोधन करून व त्यासाठी पर्याय म्हणून नवनवीन पद्धतींचा उपयोग करून बदलत्या वातावरणामध्ये झाडांवरचा ताण कमी कसा करता येईल यावर कार्य सुरू केले आहे. तसेच या संवर्धण केलेल्या वाणांचा उपयोग करून नवीन वाण निर्माण करण्यासाठीही प्रयत्न केला जाईल. महाराष्ट्र सरकारने ड्रॅगन फ्रूट लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय फळबाग योजनेअंतर्गरत अनुदान सुरू केले आहे.
चंदन व ड्रॅगन फ्रूट सारख्या नवीन प्रजातीवरती संशोधन करून शेतकर्यांना त्याविषयी सखोल माहिती देण्यासाठी नियासम बारामती कार्यरत आहे. या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी नियासम बारामतीचे संचालक, विभागप्रमुख, शास्त्रज्ञ, तांत्रिक व प्रशासकीय कर्मचारी व संशोधन सहकारी उपस्थित होते.