बारामती : येथील राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालय व जुनीअर कॉलेज बारामती चे प्राचार्य श्री राजेंद्र काकडे 33 वर्ष सेवापूर्ण करून आज 31 ऑगस्ट 2021 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. या निमित्ताने विद्यालयात आज सेवानिवृत्त सपत्निक सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुकुल समन्वयक व विद्यालयाचे माजी प्राचार्य श्री दिलीप घाडगे उपस्थित होते.
सरांनी 1 सप्टेंबर 1988 रोजी कन्या शाळा नीरा या ठिकाणी आपल्या सेवेची सुरुवात केली होती. दि 1 फेब्रुवारी 2018 पासून टेक्निकल विद्यालयात प्राचार्य म्हणून सर रुजू झाले. तेव्हापासून सरांनी विद्यालयात विविध उपक्रम राबवून शाळा गुणवत्ता पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. विद्यालयात हजर झाल्यापासून सर्वांच्या सहकार्याने, माजी विद्यार्थी मेळावे, माजी सेवक मेळावे, घेऊन शाळा गुणवत्ता वाढीसाठी व भौतिक सोई सुविधा वाढीसाठी प्रयत्न केले. सरांनी 5वी ,8वी शिष्यवृत्ती, रयत प्रज्ञा शोध परीक्षा, एन.टी.एस परीक्षा, एन.एम.एम.एस परीक्षा अश्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परिक्षेवर विशेष भर देऊन विद्यार्थ्यांची स्पर्धा परिक्षेविषयी आवड निर्माण करण्याचे प्रयत्न केले. संस्थेच्या शताब्दी महोत्सवच्या निमित्ताने खेळाडू आपल्या भेटीला, कवी आपल्या भेटीला, साहित्यिक आपल्या भेटीला , अधिकारी आपल्या भेटीला असे विविध कल्पक उपक्रम सरांनी राबवल्याने संस्थेचा उपक्रमशील शाळा हा पुरस्कार विद्यालयाला मिळाला.
Covid च्या पार्श्वभूमीवर बदलत्या काळाबरोबर सर्व शिक्षकांनी आपल्या विद्यार्थाना ऑनलाईन अध्यापन करण्यासाठी विशेष अश्या प्रशिक्षणची व्यवस्था सरांनी केली, त्यायोगे सर्व शिक्षक आज बदलत्या तंत्रज्ञान चा चांगल्या प्रकारे उपयोग करत आहेत. शिक्षकामधील विशेष गुण ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम सरांनी केले. विद्यालयातील महिला शिक्षकांसाठी महिला दिन, बालिका दिन, आरोग्य शिबीर असे विविध उपक्रम सरांनी राबवले. फक्त गुणवत्ताच न वाढवता विद्यार्थामध्ये खेळाची आवड निर्माण होण्यासाठी सरांनी प्रयत्न केले. म्हणून विविध खेळांमध्ये विद्यार्थानी यश संपादन केले. अश्या या उत्तुंग कामगिरी करणाऱ्या प्राचार्याचा आदर्श मुख्याध्यापक म्हणून सन्मान करण्यात आलेला आहे.
या सेवानिवृत्ती कार्यक्रम मध्ये श्री शशिकांत फडतरे, श्री विकास जाधव , सौ मनीषा रुपनवर, श्री कांबळे , श्री बंडू पवार यांनी आपली मनोगते व्यक्त केली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री जाधव सर यांनी, आभार उपमुख्याध्यापक श्री देवडे सर यांनी तर सूत्रसंचालन सौ उर्मिला भोसले यांनी केले.