अभ्यास करत नाही म्हणून आई मुलीला रागवली. मायलेकीच्या भांडणात अवघ्या पंधरा वर्षाच्या मुलीने चिडून रागाच्या भरात आपल्या आईचा गळा आवळून खून केला. डॉक्टर होण्यासाठी सतत अभ्यास कर म्हणून आई धटावते. या कारणाने मुलीने आपल्या जन्मदात्या आईचा जीव घेतला. या घटना पाहून वाटते “कसला हा राग आहे?” नवी मुंबईत घडलेली ही घटना अतिशय धक्कादायक आणि चिंताजनक अशीच म्हणावी लागेल.
अल्पवयीन शालेय मुले हिंसक व रागीट बनताहेत. यात दोष कुणाचा पालकांचा, मुलांचा की शिक्षण व्यवस्थेचा ? सामाजिक बांधिलकी म्हणून यावर गांभीर्याने विचार व्हायला हवा. कोरोना महामारीमुळे शिक्षणक्षेत्रासमोर अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. शाळा बंद पण आॅनलाइन शिक्षण चालू आहे. मुले घरात बसूनच मोबाइल, लॕपटॉप या उपलब्ध साहित्याच्या माध्यमातून अॉनलाइन शिक्षण घेत आहेत. कधी रेंज नसणे, कधी रिचार्ज संपणे, कधी वीज नसणे अशा अनेक अडचणी आहेत. शाळा बंद असल्याने दीड वर्षापासून मुले घरात बंदिस्त आहेत. पूर्वीसारखे मुक्तपणे वावरणे, फिरणे ,मित्रांबरोबर खेळणे, मित्रमैत्रिणींना भेटणे अशा अनेक गोष्टीवर बंधने आहेत. पालकही आर्थिक तसेच कौटुंबिक समस्यांनी ग्रस्त असल्याने कुटुंबातील वातावरण फारसे चांगले नाही. ही सगळी परिस्थिती मुलांचे मानसिक संतुलन बिघडविणारी आहे. अशा वेळी कुटुंबात वादविवाद टाळायला हवा.
मुलांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहावे याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. भीतीच्या ,दडपणाच्या वातावरणात राहून मुलांच्या एकलकोंडेपणात वाढ झाली आहे. मित्रांशी प्रत्यक्ष संवाद कमी झाला आहे. घराबाहेर अजूनही कोरोनाचे संकट असल्याने मुलांच्या शारीरिक हलचाली मंदावल्या आहेत. अशा अनेक गोष्टींचा नकारात्मक परिणाम मुलांवर होत आहे. त्यामुळे मुलांचा चिडचिडेपणा, रागीटपणा व भांडखोरपणा वाढत आहे. त्यातून अशा भयंकर घटना घडून येत आहेत. भावनांवर नियंत्रण कसे मिळवावे ? रागाला आवर कसा घालावा? वादविवादाच्या वेळी संयम कसा ठेवावा? हे सगळ्याच मुलांना जमत नाही. खरंतर कोरोना महामारीमुळे निर्माण झालेली परिस्थिती सगळ्यांची परीक्षा घेणारी आहे. कोरोनापासून आपण सुरक्षित कसे राहू याची प्रत्येकाला चिंता आहे.
शिक्षणात नवा प्रयोग चालू आहे, तो म्हणजे अॉनलाइन शिक्षण. शिक्षण थांबू नये यासाठी स्वीकारलेला हा पर्याय आहे. तो सगळ्यांना आवडेल असे नाही. तो योग्य की अयोग्य? हे येणारा काळच ठरवेल. अॉनलाइन शिक्षण शंभर टक्के समाधान करु शकत नाही. ते मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवत आहे, हे ही काय थोडेके नव्हे.
कोरोनाचे समाजातील प्रत्येक घटकावर चांगले वाईट परिणाम होत आहेत. माझ्या पाल्याचे शिक्षण चालू राहिले पाहिजे. त्याने शिक्षण घेऊन चांगला डॉक्टर, इंजिनियर बनले पाहिजे असे पालकांचे स्वप्न असते. यासाठी पालक प्रयत्न करत असतात. साहजिकच कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करण्याची अपेक्षा मुलांकडून ठेवली जाते. त्यांनी सतत अभ्यास करावा. याकडे पालक बारकाईने लक्ष ठेवतात. त्यांना सूचना देतात. अशा वेळी मुलांच्या मनाचा विचार केला जात नाही आणि त्यामुळे मुलांना याचा प्रचंड राग येतो.
किशोरवयीन मुलांच्या शरीरात पंधराव्या सोळाव्या वर्षी हार्मोन्समुळे शारीरिक बदल घडून येतात. त्यांना स्व ची जाणीव व्हायला लागते. याच वयात मुले रागीट व चिडखोर बनतात. मोठ्या माणसांनी सांगितलेल्या गोष्टी स्वीकारण्याची त्यांची तयारी नसते. स्वतःच्या मनाप्रमाणे वागण्याकडे त्यांचा कल असतो. अशा वेळी पालक म्हणून आपली जबाबदारी वाढते. मुलांशी प्रेमाने संवाद साधला पाहिजे. त्यांच्या अडचणी जाणून घ्यायला हव्यात. सर्वात महत्त्वाचे त्यांना समजून घेतले पाहिजे. प्रत्येकवेळी रागवून चिडून उपयोग होत नसतो. त्यांना ताण येईल ,दडपण येईल असे वातावरण घरात असता कामा नये. आनंददायी आणि भयमुक्त वातावरणात मुलांची मानसिकता चांगली राहते. संयम ठेवून अडचणीच्या प्रसंगावर कशी मात करावी हे मुलांना शिकविणे आवश्यक आहे. यासाठी ध्यान, प्राणायाम यांचा चांगला उपयोग होतो. आज शिक्षणात कमालीची जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे. माझ्या पाल्याला प्रवेश कुठे मिळेल ? त्याच्या करिअरचे काय होईल ? असे असंख्य प्रश्न पालकांना सतावत असतात. मुलांनी सतत अभ्यास करावा अशी पालकांची इच्छा असते. ती पूर्ण करण्यास टाळाटाळ झाली की पालक मुलांना ओरडतात, रागवितात. मुलांना संगोपन करताना त्यांच्या भावना ,विचार ,त्यांची मतेही विचारात घेतली जावीत. त्यांना व्यक्ती होण्याची संधी देणे आवश्यक आहे. मुलांची बुद्धिमत्ता ,क्षमता आणि कुवत पाहूनच आपण त्याला पुढे जाण्यास मार्गदर्शन करायला हवे.तरच पाल्य आणि पालक यांच्यामधील नाते मैत्रीचे ,मायेचे राहू शकेल.
लेखक
लक्ष्मण जगताप
बारामती