पुणे दि.१७: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधकेंद्र योजना राज्यात राबविण्यात येत असून शेतकरी व बेरोजगारासाठी रोजगारीची नवी संधी निर्माण झाली आहे.
मधमाशीपालन उद्योग करण्यास इच्छुक तसेच पात्र व्यक्तीकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. प्रशिक्षणासाठी निवड केलेल्या लाभार्थींना पुणे व मधसंचालनालय, महाबळेश्वर येथे मधमाशांपालनाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर मधमाशीपालन उद्योग करण्यासाठी लागणाऱ्या मधपेटया, मधयंत्र व इतर साहित्य खरेदीसाठी लागणाऱ्या एकूण रक्कमेच्या ५० टक्के अनुदान व ५० टक्के रक्कम स्वगुंतवणूक ही लाभार्थींची असणार आहे. मधपाळांकडून उत्पादित मध मंडळाकडून हमी भावाने खरेदी करण्यात येणार आहे.
वैयक्तिक मधपाळासाठी अर्जदार साक्षर असावा. स्व:ताची शेती असल्यास प्राधान्य देण्यात येईल. अर्जदाराचे वय १८ वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक असून १० दिवसाचे प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे.
केंद्र चालक प्रगतशील मधापाळासाठी अर्जदार किमान १० वी उत्तीर्ण असावा आणि वय २१ वर्षापेक्षा जास्त असावे. व्यक्तीच्या नांवे किंवा व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावे किमान एक एकर शेतजमीन असावी किंवा भाडेतत्वावर घेतलेली शेतजमीन लाभार्थीकडे असावी. मधमाशीपालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.
लाभार्थींची प्रशिक्षणासाठी निवड झाल्यानंतर त्यांनी मधपेट्या व इतर साहित्याची ५० टक्के स्वगुंतवणूक रक्कम प्रशिक्षणपूर्वी भरणे आवश्यक आहे. आधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांचे कार्यालयात किंवा ०२०-२५८११८५९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी ध्रुवकुमार बनसोडे यांनी केले आहे.