पुणे दि.१७: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कृषि विभागामार्फत रब्बी हंगाम २०२१ मोहिमे अंतर्गत ‘आंबा मोहोर संरक्षण’ या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे ४ जानेवारी २०२२ रोजी आयोजन करण्यात आले आहे.
आंबा हे कोकणातील व मराठवाडा मराठवाड्यातील महत्त्वपूर्ण पीक आहे. आंबा या पिकावर वेगवेगळ्या जवळपास १८५ किडी आढळतात, मात्र त्यापैकी तुडतुडे, खोडकिडा, फळमाशी, पिठ्या ढेकूण, शेंडे पोखरणारी अळी व फुलकिडे या किडीचा तसेच करपा व भुरी रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत आहे, त्यामुळे आंबा मोहराचे संरक्षण करणे आवश्यक आहे. आंबा मोहराचे किड व रोगांपासून संरक्षण करून उत्पादन वाढविण्यावर वेबिनारमध्ये चर्चा करण्यात येणार आहे.
‘विकेल ते पिकेल’अभियांनातर्गत वेबिनार मालिका चर्चा करु शेतीची, कास धरु प्रगतीची दर बुधवारी आयोजित करण्यात येते. ४ जानेवारी २०२२ रोजी फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते व प्रमुख अन्वेषक डॉ. बी. डी. शिन्दे हे आंबा पिकावरील आंबा माहोर संरक्षणाबाबत मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रम कृषी विभागाच्या https://youtube.com/c/AgricultureDepartmentGoM या लिंकवरून शेतकऱ्यांना पाहता येणार आहे. आंबा उत्पादकांनी आंबा माहोर संरक्षणाबाबत मार्गदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. फलोत्पादन संचालक श्री. मोते यांनी केले आहे.
क्षेत्रीय स्तरावरही प्रत्येक मंडळ कृषी अधिकारी कार्यक्षेत्रात ४ जानेवारी २०२२ रोजी ‘आंबा मोहोर संरक्षण’ या विषयांबाबत किमान एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये शेतकरी शास्त्रज्ञ परिसंवाद, क्षेत्रीय भेटी, शेतीशाळा, शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम, शेतकरी सभांचे आयोजन करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन संचालक श्री. मोते यांनी केले आहे.