प्रतिनिधी – पुणे जिल्हा राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या वतीने 2021 चा विशेष जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सत्यमेव करिअर अकॅडमीचे संचालक व क्रीडा प्रशिक्षक यांना 2021 चा विशेष जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बारामती नगर परिषदेचे जेष्ठ नगरसेवक किरण गुजर, राष्ट्रवादी पदवीधर संघ, पुणे जिल्हा अध्यक्ष ॲड. पृथ्वीराज जगताप, उपाध्यक्ष युन्नुस तांबोळी, महाराष्ट्र राज्य सोशल मिडीया समन्वयक सुयश जगताप, तालुका अध्यक्ष शुभम तावरे, काटेवाडीचे सरपंच विद्याधर काटे, उपसरपंच धीरज घुले, नवज्योत महिला सोसायटीच्या अध्यक्षा लिलाताई शेळके, मळद केंद्राचे केंद्र प्रमुख बाळकृष्ण खरात आदी मान्यवर उपस्थित होते.
या वितरण सोहळ्यात सत्यमेव करिअर अकॅडमी बारामती येथील स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगीरी केलेल्या व पोलीस दलात भरती झालेल्या 25 पेक्षा जास्त उमेदवारांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या प्रसंगी स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सत्यमेव करिअर अकॅडमीचे संस्थापक संचालक शरद नामदे, संचालक संतोष जगताप, क्रीडा प्रशिक्षक गोविंद भोसले यांचा राष्ट्रवादी पदवीधर संघ, पुणे जिल्हा यांच्या वतीने 2021 चा विशेष जीवनगौरव पुरस्कार देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच सत्यमेव करिअर अकॅडमी, बारामतीच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रवादी पदवीधर संघाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष युन्नुस तांबोळी यांचाही विशेष जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी उमेदवारांनी स्पर्धा परीक्षा क्षेत्रात मिळविलेल्या यशाचे कौतुक केले, तसेच प्रत्यक्ष सेवेत रूजू झाल्यानंतर कोणीही यशाने हुरळून किंवा अपयशाने खचून न जाता प्रामाणिकपणे समाजाची सेवा करण्याचे अवाहन केले. त्याचबरोबर सत्यमेव करिअर अकॅडमीमधील संचालक व शिक्षक वृंद, क्रीडा प्रशिक्षक अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन करून उमेदवारांच्या रोजी रोटीचा प्रश्न सोडवत असल्याने त्यांचे तोंड भरून कौतुक केलेच, त्याबरोबरच पुणे जिल्हा राष्ट्रवादी पदवीधर संघाची वाटचालही अतिशय चांगल्या प्रकारे चालू असल्याने सर्व पदाधिकाऱ्यांचेही तोंड भरून कौतुक केले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक युन्नुस तांबोळी यांनी केले. पोलीस दलात निवड झालेल्या निवडक विद्यार्थ्यांनीही मनोगताच्या माध्यमातून आपले अनुभव कथन केले. पुरस्कारार्थिंच्या वतीने संचालक संतोष जगताप यांनी मनोगत व्यक्त केले तर सूत्रसंचालन सारिका वाबळे यांनी व आभार प्रदर्शन शुभम तावरे यांनी केले.