निरावागज येथे ऊस खोडवा व पाचट व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न

बारामती 26:- महाराष्ट्र शासन कृषि विभाग व माळेगाव सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने श्री वाघेश्वरी मंदिर निरावागज बारामती येथे ऊस खोडवा व पाचट व्यवस्थापन व प्रात्याक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
उपविभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे यांनी पाचट कुजविण्याचे फायदे तसेच खर्चात बचत करून उत्पन्नवाढीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. पाचट जाळल्यामुळे जमिनीतील जैविक घटकांचा व अन्नद्रव्यांचा नाश होतो. ऊसाच्या पाचटात 0.50 टक्के नत्र, 0.20 टक्के स्फुरद, 1 टक्के पालाश आणि 40 टक्के सेंद्रिय कर्ब असतो. ऊसाचे पाचट जाळल्यामुळे पर्यावरण प्रदूषण होऊन आजारांचे प्रमाण वाढते असेही त्यांनी सांगितले.
तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदल यांनी कृषि विभागाच्या महाडीबीटी अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण, कांदाचाळ, ठिबकसिंचन, रब्बी पीक विमा, शेतीशाळा महात्मा गांधी रोजगार हमी योजना फळबाग लागवड, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग इत्यादी योजनांचे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर ऊसाचे पाचट कुजवण्याविषयीही शेतकऱ्यांना आवाहन केले.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी सुरेश काळे यांनी प्रत्यक्ष प्लॉटवर जाऊन बुडके छाटणे, पाचट योग्य पद्धतीने पसरविणे, रासायनीक खते व जिवाणू खते देण्याची पद्धत याबाबत प्रात्याक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी माळेगाव सह. साखर कारखान्याचे संचालक गुलाबराव देवकाते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संपतराव देवकाते, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन उदयसिंह देवकाते, ग्राम पंचायत सदस्य, प्रयोगशील शेतकरी व वाघेश्वरी बचतगटाचे शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *