बारामती (प्रतिनिधी) – दिनांक 29 जुलै रोजी ओबीसीचे आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी ओबीसी आरक्षण कृती समिती यांच्या वतीने बारामती येथे एल्गार मूक महामोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातून जवळपास 30 ते 40 हजार लोक उपस्थित राहतील असा दावा ओबीसी आरक्षण कृती समितीने केला आहे. हा मोर्चा राजकारण विरहित, पक्ष विरहित असून ओबीसी समाजाने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. या मोर्चासाठी नाना पटोले, विजय वडेट्टीवार ,चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, राम शिंदे, योगेश टिळेकर, महादेव जानकर, प्रकाश अण्णा शेंडगे हे उपस्थित राहणार आहेत. सदर मोर्चाची कसब्यातील छत्रपती शिवाजी उद्यान येथून सुरुवात होऊन प्रशासकीय भवन येथे त्याची सांगता सभा होणार आहे. दरम्यान पत्रकार परिषदेमध्ये कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले की समता परिषदेमार्फत संपूर्ण महाराष्ट्रात मोर्चे, आंदोलने, रास्तारोको होत आहे मग बारामतीतच का नाही ? असा सवाल यावेळी उपस्थित केला गेला. याच बरोबर समता परिषदेने या कृती समितीतून या मोर्चातून बाहेर पडलो आहोत असे पत्राद्वारे प्रसिद्ध केले आहे. परंतु समता परिषदेने या मोर्चासाठी पाठिंबाच दिला नाही किंवा अशा स्वरूपाची कोणतेही पत्र दिले नाही तर ते या कृती समिती मधून बाहेर कसं काय पडू शकतात असा सवाल कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत उपस्थित केला गेला. कोणत्याही परिस्थितीत हा एल्गार मूक महामोर्चा होणारच यावर कृती समिती ठाम आहे असे यावेळी सांगण्यात आले.