पुणे दि.23: प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२१-२२ अंतर्गत खरीप हंगाम २०२१ मध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबी अंतर्गत शेतक-यांनी पिक नुकसानीच्या पूर्वसूचना विमा कंपनीस कळविण्याबाबत तसेच याबाबत अधिक तपशीलासाठी नजीकच्या उपविभागीय कृषि अधिकारी तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी केले आहे.
माहे जुलै महिन्यात पुणे जिल्ह्यात सर्वत्र पाऊस होत आहे. दि. २१ व २२ जुलै रोजी ब-याच मंडळामध्ये अतिवृष्टीही झाली आहे. सध्या खरीप पिक पेरण्या मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत. यामध्ये पावसामुळे सदरील पिकाचे नुकसान झाले असल्यास ज्या शेतक-यांनी आपल्या पिकांचा विमा उतरविला आहे, अशा विमाधारक शेतक-यांनी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखीम अंतर्गत झालेल्या नुकसानीचे सर्वप्रथम प्राधान्याने सर्व्हे नं नुसार बाधीत पिक व बाधीत क्षेत्राबाबत crop Insurance App या मोबाईल अॅपद्वारे पूर्वसूचना ७२ तासांच्या आत देण्यात यावी, मोबाईल अॅपद्वारे शक्य न झाल्यास संबंधीत विमा कंपनीच्या १८००२६६०७०० या टोल फ्री क्रमांकावर सुचना देण्यात यावी. अथवा सदर आपत्तीची माहिती बँक तसेच कृषि विभाग यांना द्यावी. तसेच सदरची माहिती संबंधीत बँक तसेच कृषि विभागाकडून संबंधीत विमा कंपनीस तात्काळ पुढील ४८ तासात पाठविण्यात यावी. याबाबत अधिक तपशीलासाठी नजीकच्या उपविभागीय कृषि अधिकारी तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी केले आहे.