मुंबई : निवडणूक आयोगाने देशात लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. यानुसार देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. तर, महाराष्ट्रात पाच टप्प्यात होणार मतदान होणार आहे. महाराष्ट्राच्या पहिला टप्पा 19 एप्रिल 2024 रोजी पार पडत आहे. या पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघात निवडणूकीसाठी मतदान होईल. विदर्भ हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु, 2004 पासून पूर्व विदर्भात भाजपने मोठी मुसंडी मारली आहे. पूर्व विदर्भातील या पाच मतदारसंघात कॉंग्रेसची रामटेक वगळता अन्य चार ठिकाणी भाजपसोबत तर, रामटेकमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या उमदेवारासोबत लढत होत आहे. भाजप आणि कॉंग्रेस या पक्षातच खरी लढत होणार असली तरी बसपा आणि वंचितच्या एंट्रीमुळे येथील लढती रंजक झाल्या आहेत. वंचित आणि बसपा यांच्यामुळे मतविभाजनाचा फटका बसू नये याची काळजी घेतानाच भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.