आता घरोघरी मिळणार ही सुविधा; भाजपच्या जाहिरनाम्यात दिली ही गॅरंटी

लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजपने खऱ्या अर्थाने आज शंखनाद केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहिरनाम्यात गरीब, शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासंबंधी कटिबद्ध असल्याचा दावा केला आहे. जाहिरनाम्यात अनेक घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. गेल्या काही महिन्यांपासून उज्ज्वला गॅस योजना आणि सर्वसामान्यांच्या घरगुती गॅस योजनांवर केंद्र सरकारने अनुदान दिले आहे. त्यामुळे गॅस सिलेंडरचा भाव थोड्याफार प्रमाणात कमी झाला आहे. आता घरोघरी गॅस पाईपलाईन पुरविण्याचे उद्दिष्ट भाजपने समोर ठेवले आहे. दिल्लीत आज भाजपने जाहिरनामा प्रसिद्ध केला.
सात महिन्यांपासून दरवाढीला ब्रेक 
सरकारी कंपन्यांनी गेल्या सात महिन्यांपासून घरगुती गॅसच्या किंमतीत दरवाढ केली नाही. 14.2 किलोग्रॅम घरगुती गॅसच्या किंमतीत सध्या वाढ करण्यात आलेली नाही. उलट त्यात 300 रुपयांची कपात करण्यात आली आहे. तर काही महिन्यात किंमती स्थिर आहेत. या बदलामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता हा बदल निवडणुकीपूरताच आहे की नंतर पण ही कपात कायम राहिल, हे लवकरच समोर येईल.
उज्ज्वला योजनेची सबसिडी पुढील वर्षांपर्यंत
गेल्या मार्च महिन्यात, केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेतंर्गत गरीब महिलांना 300 रुपये प्रति सिलेंडरची सबसिडी जाहीर केली होती. ही सबसिडी मार्च 2024 पर्यंत लागू होती. आता ही सबसिडी 31 मार्च 2025 रोजीपर्यंत वाढविण्यात आली आहे. सबसिडीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
दोन वर्षांपूर्वीच दिली होती माहिती
केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दोन वर्षांपूर्वी संसदेत, प्रश्नोत्तराच्या तासात घरोघरी गॅस पाईपलाईनची सुविधा पुरविण्याच्या योजनेची माहिती दिली होती. त्यानुसार, गॅस पाईप लाईनचा देशभरात विस्तार करण्यात येणार आहे. देशातील 82 टक्क्यांहून अधिक भूमीवर आणि 98 टक्के लोकसंख्येपर्यंत घरगुती गॅस, पाईपलाईनद्वारे पुरवठा करण्यात येणार आहे. देशात 1000 एलएनजी स्टेशन तयार करण्याचा संकल्प पण सोडण्यात आला होता.
स्थिर सरकारची गरज
जगातील अनेक भागात सध्या अस्थिरता आहे. अनेक भागातील वातावरण आपण पाहत आहोत, त्यामुळे देशात स्थिर सरकारची गरज असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले आहे. देशात मजबूत सरकार असेल तर ते कठोर निर्णय घ्यायला मागेपुढे पाहत नसल्याचे ते म्हणाले.