शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करण्यामध्ये शिक्षकांचा सिंहाचा वाटा
प्रतिनिधी – प्रजासत्ताक दिनाच्या ७५ व्या वर्धापनदिन समारंभात तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये मा.खासदार संसदरत्न सौ.सुप्रियाताई सुळे यांनी सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकांशी संवाद साधला. याप्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या की, ‘भारतीयांसाठी २६ जानेवारी हा दिवस महत्वाचा असून ज्यांनी देशासाठी संघर्ष केला व आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांचे याप्रसंगी स्मरण करण्याचा हा दिवस !. संविधानाने सर्वांना समान अधिकार मिळवून दिले. राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, विनोबा भावे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतरावजी चव्हाण हे आपले आदर्श राष्ट्रपुरुष आहेत. त्यांच्या कार्याचे नवीन पिढीने अनुसरण केले पाहिजे. पुढे त्या असेही म्हणाल्या की, अप्रतिम अशा अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील युवा पिढी घडविणारे उत्तम शिक्षकाची परंपरा या महाविद्यालयाने जपली आहे. शासन धोरणे ठरविण्याचे काम करते. परंतू त्याची ख-या अर्थाने अंमलबजावणी करण्याचे काम शिक्षक करीत असतात. विविध व्यक्तिमत्वाच्या मुलांना घडविणा-या शिक्षकाचे काम सातत्य, शाश्वत व गुणवत्तापूर्ण विकास घडविण्याचे असते. सध्याच्या प्रगत काळामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता हे एक आव्हान आहे. असे असले तरी या जगात विद्यार्थ्यांना शिक्षणात आवड निर्माण करण्याचे काम शिक्षकच करू शकतो कारण कृत्रिम बुद्धिमत्तेपेक्षा भावनिक बुद्धिमत्ता महत्वाची आहे. या दोन्ही गोष्टींचा मिलाफ शिक्षकच घडवू शकतात’.
याप्रसंगी मा. खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांचा अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री.जवाहर शाह वाघोलीकर यांनी सत्कार केला. अनेकान्त एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य सत्यजित शहा पंदारकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर, संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त याप्रसंगी उपस्थित होते. लेफ्ट. डॉ.विवेक बळे यांचा गुजरात येथे झालेल्या शिबिरामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सन्मानित केले याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. एनसीसी मध्ये प्राविण्य मिळविल्याबद्दल विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी संचलन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश जगताप, अनेकान्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज चे संचालक, डॉ.एम.ए. लाहोरी, अनेकान्त इंग्लिश स्कुलच्या प्राचार्या डॉ.ऋचा तिवारी, उपप्राचार्य, अधिष्ठाता, प्राध्यापक, रजिस्ट्रार, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.