तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात राज्यस्तर बेसबॉल स्पर्धा संपन्न

क्रीडा व युवक सेवा संचालनालय. महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद पुणे व अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित शासकीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२३-२४ मधील राज्यस्तर शालेय बेसबॉल स्पर्धा नुकतीच महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर संपन्न झाली. या स्पर्धेत महाराष्ट्र्र राज्यातील मुंबई, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती, नागपूर व पुणे असे मुलांचे आठ व मुलींचे आठ विभागाचे असे एकूण १६ संघ आलेले होते.
स्पर्धेचा उदघाटन समारंभ तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले व प्राचार्य डॉ.अविनाश जगताप यांचे शुभहस्ते संपन्न झाला. या प्रसंगी प्राचार्य डॉ.अविनाश जगताप यांनी महाराष्ट्रातून आलेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या व आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी व भविष्यातील करिअरच्या दृष्टीने खेळाकडे पाहून त्यानुसार आपला दैनंदिन सराव करावा असे आवाहन केले. या प्रसंगी उपप्राचार्य डॉ.अशोक काळंगे, डॉ.सचिन गाडेकर, शारीरिक शिक्षण संचालक डॉ.गौतम जाधव, रजिस्ट्रार श्री.अभिनंदन शहा, उपप्राचार्या प्रा.वैशाली माळी, प्रा.गोरखनाथ मोरे व प्रा.संजय शेंडे उपस्थित होते.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पुणे विभागाचे उपसंचालक अनिल चोरमले, पुणे जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, महाराष्ट्र बेसबॉल संघटनेचे खजिनदार अशोक सरोदे व प्राचार्य डॉ.अविनाश जगताप यांचे हस्ते प्रथम तीन क्रमांक प्राप्त संघाना चषक, प्रमाणपत्र व मेडल्स देऊन सन्मानित करण्यात आले. या मध्ये मुलांच्या गटात प्रथम क्रमांक – तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती (पुणे विभाग), द्वितीय क्रमांक राष्ट्रीय विद्यालय ज्युनिअर कॉलेज, चाळीसगाव (नाशिक विभाग), तृतीय क्रमांक राजर्षी शाहू कॉलेज, लातूर तर मुलींच्या गटात प्रथम क्रमांक तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती (पुणे विभाग), द्वितीय क्रमांक स्वामी रामानंद विद्यालय व ज्युनिअर कॉलेज , रामानंदनगर, सांगली (कोल्हापूर विभाग), साने गुरुजी निवासी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, केज ता.केज, जी.बीड (छत्रपती संभाजीनगर विभाग) यांना प्राप्त झाले.
अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, जवाहर शाह (वाघोलीकर), सचिव मिलिंद शाह (वाघोलीकर) यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अशोक देवकर यांनी तर आभार डॉ.गौतम जाधव यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *