तुळजाराम चतुरचंद कनिष्ठ महाविद्यालय महिला सबलीकरण समितीच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त प्रा.डॉ.महादेव रोकडे मराठी विभाग प्रमुख टीकाराम जगन्नाथ महाविद्यालय, खडकी यांचे ‘पुस्तक समाजाचे मस्तक’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ते म्हणाले की, ‘ जो पुस्तकापुढे नतमस्तक होतो समाज त्याच्यापुढे नतमस्तक होतो. जे जे विचारवंत झाले त्यापाठीमागे पुस्तक वाचनाची प्रेरणा अग्रक्रमाने होती. व्यक्तिमत्व विकासात ग्रंथाचे स्थान अनन्यसाधारण आहे’.
या प्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कला शाखेच्या अधिष्ठाता डॉ.सीमा नाईक-गोसावी म्हणाल्या की, ‘सावित्रीबाई फुले व महात्मा फुले हे समाजशिक्षक होते. ख-या अर्थाने हे दांपत्य समाजाचे पुस्तकच होते. प्रतिकूल परिस्थितीत समाजाला दिशा देण्याचे कार्य त्यांनी केले. माणसाला माणूसपण देणारा शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही’.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महिला सबलीकरण प्रमुख प्रा.वैशाली पोळ यांनी केले. तर आभार प्रा.अनिता पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा.स्मिता मंगुडकर यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर, सचिव मिलिंद शाह वाघोलीकर यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास प्रा.गोरखनाथ मोरे व समिती सदस्य, कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या