पुणे, दि. २८ : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०२३-२४ अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत राज्याबाहेर शेतकऱ्यांचे प्रक्षेत्र भेट हा कार्यक्रम राबविण्यात येणार असून या कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी जिल्ह्यातील इच्छुक फलोत्पादक शेतकऱ्यांनी ३१ डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
राज्याबाहेर दौरा कार्यक्रमात फलोत्पादक शेतकऱ्यांसाठी तसेच शेतकऱ्यांमध्ये फलोत्पादन विषयक जिज्ञासा व आवड निर्माण करण्याच्या हेतूने तसेच फलोत्पादनाची प्रतवारी, हाताळणी, शेतस्तरावर करावयाची प्रक्रिया उद्योग स्थापन करणे, फलोत्पादनाच्या विपणन व्यवस्थेबाबत अभ्यास करणे, आधुनिक लागवड व काढणीपश्चात तंत्रज्ञानाबाबत सखोल शास्त्रोक्त ज्ञान उपलब्ध करुन देणे, शेतकऱ्यांनी स्वतःची व त्याचबरोबर समूहाची फलोत्पादन विषयक शेती उन्नत करणे इत्यादी विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या दौऱ्यात फळबाग, भाजीपाला, फुले लागवड, विदेशी फळपिक लागवड आधुनिक तंत्रज्ञान जाणून घेता येईल. फळबाग लागवड, भाजीपाला लागवड, फुले लागवड करणाऱ्या, शेडनेटगृह व हरितगृह उभारणी, फळप्रक्रिया इत्यादी बाबत प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.
सहभाग घेण्यास इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषि अधिकारी किंवा संबधित उपविभागीय कृषि अधिकारी यांचेकडे आपले अर्ज, सात बारा, ८ अ, आधारकार्ड व छायाचित्रासह सादर करावेत, असेही आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.