यात्रेत ४ हजार नागरिकांनी घेतला विकसित भारतासाठी संकल्प
बारामती, दि. १८: विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून बारामती तालुक्यात केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची ४८ गावात जनजागृती करण्यात आली असून यात्रेत ४ हजार नागरिकांनी विकसित भारतासाठी संकल्प घेतला.
केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची माहिती ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन तालुक्यात आयोजन करण्यात आले आहे. ही संकल्प यात्रा २६ जानेवारी २०२४ पर्यंत सूरू राहणार आहे. आतापर्यंत ४८ ठिकाणी या यात्रेचे आयोजन करण्यात आले असून याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. १० हजार ८९ नागरिकांनी सहभाग घेतला आहे.
यावेळी तालुक्यात ३०९ ठिकाणी आरोग्य शिबाराचे आयोजन करुन ६१० क्षयरोगी, ६९ सिकलसेलग्रस्तांची तपासणी करण्यात आली आहे. पीएम सुरक्षा विमा योजनाअंतर्गत १०८, पीएम जीवन ज्योती विमा योजनाअंतर्गत ९५ नागरिकांची नोंदणी करण्यात आली. तसेच २२ प्रधानमंत्री आयुष्यमान योजना कार्ड वितरीत करण्यात आले.
प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत ८ नागरिकांची नोंदणी करण्यात आली. ४३४ महिला, ४७५ विद्यार्थी, ४३८ खेळाडू आणि ३३० स्थानिक कलाकार कलाकारांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले.विविध ठिकाणी शेतकऱ्यांसाठी ड्रोन प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात येत आहे. यात्रेद्वारे ३५ शेतकऱ्यांशी नैसर्गिक शेतीविषयी संवाद साधला. २२ संगणकीकृत अभिलेख्यावर कार्यवाही करण्यात आली आहे. रमाई घरकुल योजनेअंतर्गत नमुना – ‘८ अ’ चे उतारे वितरण करण्यात येत आहेत.
तालुक्यात केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची आकर्षक एलडी चित्ररथाद्वारे प्रसिद्धी करण्यात येत असल्याने गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी होऊन माहिती घेत आहेत. यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना योजनांची माहिती पुस्तिका, घडीपत्रिकेचे वाटपही करण्यात येत आहे. आपल्या गावाताच योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळत असल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.
यात्रा १९ डिसेंबर रोजी मळद व डोर्लेवाडी, २० डिसेंबर रोजी झारगडवाडी व सोनगाव, २१ डिसेंबर रोजी मेखळी व घाडगेवाडी, २२ डिसेंबर रोजी निरावाघज व पाहुणेवाडी, २३ डिसेंबर रोजी खांडज व शिरवली, २४ डिसेंबर रोजी सांगवी व कांबळेश्वर आणि २५ डिसेंबर रोजी शिरष्णे व लाटे गावात येणार असून नागरिकांनी या यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गटविकास अधिकारी अनिल बागल यांनी केले आहे.