बारामती,दि १२: तहसीलदार गणेश शिंदे याच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय भवन येथे झालेल्या बैठकीत संजय गांधी निराधार अनुदान योजनचे १७५, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना ७८, इंदिरा गांधी योजना १४ आणि राष्ट्रीय कुटुंब योजनेचे २ असे एकूण २६९ अर्ज मंजूर करण्यात आले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त नवीन प्रशासकीय भवन येथे लाभार्थी निवड बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदार सुवर्णा ढवळे, अव्वल कारकून व महसूल सहाय्यक आदी उपस्थित होते.
यावेळी तालुक्यातील नागरिकांनाकडून प्राप्त झालेल्या एकूण २८५ अर्जाची छाननी करण्यात आली. यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत एकूण १७९ प्राप्त अर्जापैकी १७५ अर्ज मंजूर करण्यात आले. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत एकूण ९० प्राप्त अर्जापैकी ७८ अर्ज मंजूर करण्यात आले. तसेच इंदिरा गांधी योजनेअंतर्गत एकूण १४ प्राप्त अर्जापैकी १४ आणि राष्ट्रीय कुटुंब योजनेअंतर्गत एकूण २ प्राप्त अर्जापैकी दोन्ही अर्ज मंजूर करण्यात आले आहे.