‘विकसित भारत’ संकल्प यात्रेला बारामती तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

बारामती, दि.७: भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्याच्या दृष्टीकोनातून ‘विकसित भारत’ संकल्प यात्रेचा रथ आज बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी येथे असून या यात्रेला तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पंचायत समिती येथून ‘विकसित भारत’संकल्प यात्रेचा एलईडी चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून २६ नोव्हेंबर रोजी शुभारंभ करण्यात आला होता. विकसित भारत संकल्प यात्रा रथ तालुक्यातील एकूण ९९ गावात जाणार आहे. आजपर्यंत तालुक्यातील गुणवडी, पिंपळी, काटेवाडी, ढेकळवाडी, कन्हेरी, सावळ, जैनकवाडी, कटफळ, गाडीखेल, साबळेवाडी, पारवडी, निंबोडी, शिर्सुफळ, उंडवडी क.प. उंडवडी सुपे, जराडवाडी, बऱ्हाणपूर, सोनवडी सुपे, कारखेल, देऊळगाव रसाळ, कोळोली, नारोळी, सुपा, वढाणे, कुतवळवाडी आणि भोंडवेवाडी असे एकूण २६ गावात रथाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली आहे.

भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘विकसित भारत’ यात्रेदरम्यान मेरी कहानी मेरी जुबानी, विकसित भारताचा संकल्प,धरती कहे पुकारके कार्यक्रम, आरोग्य तपासणी शिबीर, क्षयरोगी शोध व तपासणी, सिकलसेल स्क्रिनिंग, माय भारत स्वयंसेवक, आयुष्यमान भारत कार्ड वाटप, हर घर जल आदी उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी योजनांच्या माहितीपुस्तिकेचे नागरिकांना वितरण करण्यात येत आहे.

ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामंपचायत स्तरावर उपसमिती गठीत करण्यात आली आहे. ‘विकसित भारत’संकल्प यात्रेचे उद्दिष्टपूर्तीकरीता लोकप्रतिनिधी व लाभार्थ्यांनी सोबत मिळून मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी या यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गटविकास अधिकारी अनिल बागल यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *