पुणे, दि. १०: जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने वाहतूक नियमांच्या उल्लंघनासंदर्भात प्रलंबित असलेल्या चलन प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी पोलीस उप आयुक्त, पुणे शहर वाहतूक शाखा, येरवडा येथे शनिवार ९ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे.
या लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणाचा निपटारा होण्याच्यादृष्टीने आणि वाहतूक चलनांचे तडजोडीनंतर दंडातील मिळू शकणाऱ्या सवलतींबाबतबी माहिती सर्वांना मिळण्याकरिता २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत वाहतूक शाखा, येरवडा येथे मदत कक्ष (हेल्पडेस्क) सुरू करण्यात येणार आहे. या हेल्पडेस्कच्या माध्यमातून वाहतूक नियमभंग केलेल्या वाहनावर चलनांची निर्मिती तडजोडीअंती सूट देवून करण्यात येणार आहे.
सर्व संबंधितांनी २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत सकाळी ११ ते सायं. ५ वाजेपर्यंत पोलीस उप आयुक्त, वाहतूक शाखा, बंगला क्रमांक ६, येरवडा पोष्ट कार्यालयाशेजारी, पुणे येथे उपस्थित राहून आपापल्या प्रकरणांचा निपटरा करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती सोनल एस. पाटील यांनी केले आहे.