निर्यातक्षम फळबागांची हॉर्टीनेट प्रणालीवर शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन

पुणे, दि.२२ : निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांनी हॉर्टीनेट प्रणालीवर शेतनोंदणी करण्याचे आवाहन कृषी आयुक्तालयाने केले आहे.

निर्यातक्षम द्राक्ष व आंबा फळ पिकाची नोंदणी २०२३-२४ मध्ये सुरू झाली असून इतर पिकांची नोंदणी वर्षभर सुरू आहे. राज्यातून फळे व भाजीपाला पिकांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी व आयातदार देशांच्या किडनाशक उर्वरित अंश व किड रोग मुक्ततेबाबतची हमी देण्यासाठी सन २००४-०५ पासून ग्रेपनेट या ऑनलाइन कार्यप्रणालीची अंमलबजावणी सुरू आहे. २०२२-२३ मध्ये द्राक्षासाठी ग्रेपनेट प्रणालीवर ४६ हजार ९७, आंब्यासाठी मँगोनेट प्रणालीवर ९ हजार ९९१, भाजीपाल्यासाठी व्हेजनेट प्रणालीवर ८ हजार २५ शेतांची नोंदणी झालेली आहे. तसेच हॉर्टिनेट प्रणालीवर ७३ हजार ५६५ शेतकऱ्यांची नोंदणी झाली होती.

सन २०२३-२४ मध्ये निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकांची ट्रेसेबिलिटी नेटद्वारे नोंदणी करण्याकरिता १.२५ लाख लक्षांक सर्व संबंधित जिल्ह्यांना वितरित करण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत सद्य स्थितीत शेतनोंदणी अत्यंत अल्प झाली असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी निर्यातक्षम पिकांची शेतनोंदणी संबंधित प्रणालीवर करावी, असेही आवाहन कृषी आयुक्तालयातील फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *