आयुष्मान भारत कार्ड काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

पुणे, दि. ६ : आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेता यावा यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करण्यासह आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढून घ्यावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही भारत सरकारची आरोग्य विमा योजना असून २३ सप्टेंबर २०१८ पासून राज्यात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसोबत एकत्रितरित्या सुरू करण्यात आली आहे. सुधारित एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राज्यात १ एप्रिल २०२० पासून लागू करण्यात आली आहे.

आयुष्मान भारत योजनेंतर्गत अंगिकृत रुग्णालयात दाखल झालेल्या लाभार्थ्याला प्रति कुटुंब प्रति पॉलिसी वर्ष ५ लाख रुपयांपर्यंत आरोग्य कवच पुरविण्यात येते. ५ लाखापर्यंतच्या रुग्णालयीन खर्चाचा लाभ पॉलिसी वर्षात कुटुंबातील एक किंवा सर्व सदस्य घेऊ शकतात. या योजनेत १ हजार २०९ शस्त्रक्रिया, चिकित्सा, उपचार उपचार समाविष्ट असून पुणे जिल्ह्यात ५७ खासगी व १२ शासकीय अशा एकूण ६९ रुग्णालयांचा समावेश आहे.

जनगणना २०११ यादीतील आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात १ लाख ७९ हजार ३९५ कुटुंबे आणि शहरी भागात २ लाख ७७ हजार ६३३ कुटुंबे अशी ४ लाख ५७ हजार २८ कुटुंबे या योजनेचे पात्र लाभार्थी आहेत.

जिल्ह्यात या योजनेचे एकूण पात्र लाभार्थी १६ लाख ८८ हजार ६८७ असताना आतापर्यंत केवळ ४ लाख २६ हजार ३७३ लाभार्थ्यांनी आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढले आहे. ही खूप महत्त्वाची आरोग्य योजना असून सर्व पात्र लाभार्थ्यांनी आयुष्मान भारत कार्ड तयार करुन घेणे आवश्यक आहे.

गोल्डन कार्ड काढण्यासाठी https://beneficiary.nha.gov.in हे पोर्टल तयार करण्यात आले आहे. यामध्ये लाभार्थी स्वत: कार्ड काढू शकतो. तसेच आशा सेविकांनादेखील हे कार्ड काढण्यासाठी लॉगीन आयडी देण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यात १ हजार १९९ आशा सेविकांमार्फत कार्ड काढता येतील.

https://aapkedwarayushman.pmjay.gov.in/AapkeDwar या संकेतस्थळावर लाभार्थ्यांची यादी उपलब्ध आहे. तरी सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपले आयुष्मान कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केले आहे.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *